गवतगंजींना आग लागण्याचे प्रकार सुरूच
सोमवारी पुन्हा एक गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी : शेतकऱ्यात भीतीचे वातावरण
बेळगाव : येळ्ळूर आणि शहापूर शिवारात गवतगंजींना आग लागण्याच्या घटना सुरूच आहेत. सोमवारी दुपारी शहापूर शिवारातील आणखी एका गवतगंजीला आग लागल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी नशेबाज तरुणांमुळेच हा प्रकार घडला असावा, असा संशय शेतकऱ्यांतून व्यक्त केला जात आहे.
येळ्ळूर, शहापूर शिवारातील शेतकऱ्यांनी मळणी केलेले गवत अद्याप शिवारातच ठेवले आहे. तर काही शेतकऱ्यांनी कापलेल्या भाताच्या गंज्या त्याच ठिकाणी ठेवल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या शिवारात नशेबाज तरुणांचा वावर वाढला असून, गांजा तसेच सिगारेट ओढून त्यांची थोटके गवतगंजीच्या बाजूला टाकली जात असल्याने गंजींना आग लागण्याच्या घटना घडत आहेत.
चार दिवसांपूर्वी येळ्ळूर शिवारातील गवतगंजींनी पेट घेतल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा सोमवारी शहापूर शिवारात दुसऱ्या गवतगंजीला आग लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात असून, शिवारात वावरणाऱ्या नशेबाज तरुणांवर पोलीस खात्याच्यावतीने आवर घालण्यात यावा, अशी मागणीही केली जात आहे.