कुमारस्वामी लेआऊट परिसरात गवताला आग
अग्निशमनच्या तत्परतेमुळे इमारतींना धोका टळला
बेळगाव : शहरात वाढत्या उन्हासह आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. मंगळवारी दुपारी कुमारस्वामी लेआऊट परिसरात गवताला आग लागली. शहराला लागूनच असलेल्या या भागात आग लागल्याने शहराच्या उत्तर भागात धुराचे लोळ येत होते. या आगीमध्ये परिसरातील गवत व अनेक झाडे जळून खाक झाली. तसेच वेळेत आग विझविल्याने मोठा धोका टळला. कुमारस्वामी लेआऊट परिसरात मोठ्या प्रमाणात गवत आहे. या गवताला अज्ञातांनी लावलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. 7 ते 8 फूट उंच गवत व झुडुपे असल्याने आग पसरत गेली. गवताला लागूनच इमारती असल्याने धोका निर्माण झाला होता. स्थानिकांनी अग्निशमन विभागाला वेळीच कळविल्याने ते घटनास्थळी दाखल झाले. आग इमारतींपर्यंत पोहोचण्यापूर्वी अग्निशमन बंबांनी आटोक्यात आणण्यात आली. परंतु यामध्ये अनेक झाडांचे नुकसान झाले. अग्निशमन विभागाचे जवान व्ही. जी. कोलकार, एम. एम. जाकुटी, अशोक पाटील, प्रकाश पाटील, बुड्डेनवर यांसह इतर उपस्थित होते. सध्या उन्हामुळे आगीच्या घटना वाढल्या असल्यामुळे खबरदारी घेण्याची सूचना अग्निशमन विभागाचे ठाणाधिकारी शिवाजी कोरवी यांनी केली.