अनगोळमध्ये वीजवाहिन्यांमुळे गवत गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी
बेळगाव : वीजवाहिन्यांच्या घर्षणातून ठिणग्या पडून गवत गंजीला आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी अनगोळ शिवारात घडली. चार दिवसांपूर्वी भाताची मळणी करून गंजी घालण्यात आली होती. या गंजीलाच आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून हेस्कॉमकडे याबाबतची तक्रार देण्यात आली आहे. झेरे गल्ली, अनगोळ येथील शेतकरी सुभाष मारुती सांबरेकर यांच्या गवत गंजीला सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागल्याचे त्यांना समजले. तात्काळ त्यांनी अनगोळ शिवारात पोचून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोवर संपूर्ण गवत जळून खाक झाले. गवत गंजीवरून विद्युत मोटरसाठी वीजवाहिनीची जोडणी आहे. बऱ्याच वेळा वीजवाहिन्यांचे घर्षण होऊन ठिणग्या पडत होत्या. अशाप्रकारच्या ठिणग्यांमुळेच गवत गंजीला आग लागली असावी, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. हेस्कॉमच्या शहर उपविभाग-2 अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार संबंधित शेतकऱ्याने केली आहे. गवत गंजीला आग लागल्यामुळे सध्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून तात्काळ मदत करण्याची मागणी केली जात आहे.