राजहंसगडाच्या पायथ्याशी गवताला आग
खेळण्याच्या दुकानांना आगीचा फटका
बेळगाव : राजहंसगड किल्ल्याच्या पायथ्याशी शनिवारी दुपारी गवताने पेट घेतल्याने आगीची दुर्घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाऱ्यामुळे एका खेळण्याच्या दुकानालाही आग लागल्याने खेळणी व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. शनिवार दि. 8 मार्च रोजी दुपारी ही घटना घडली आहे. महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून राजहंसगडाचे सुशोभीकरण झाल्यानंतर किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. विकेंडला गर्दी अधिक असते.
शनिवारी दुपारी किल्ल्याच्या पायथ्याशी जमिनीवरील गवताने पेट घेतला. त्याचवेळी वारा सुटल्यामुळे आग वाढली. गडाजवळच्या एका खेळण्याच्या दुकानाला आग लागल्याने खेळणी जळून खाक झाली. अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. बंबासह जवान राजहंसगडावर दाखल झाले. पाण्याचे फवारे मारून त्यांनी आग आटोक्यात आणली. आगीमुळे आणखी दोन ते तीन दुकानांनाही फटका बसला आहे. वाऱ्यामुळे आगीच्या झळा पर्यटकांपर्यंत पोहोचल्या. त्यावेळी काही लहान मुले किंचाळत धावत सुटली. आगीत खेळणी विक्रेत्यांसह सरकारी मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.