गवत जाळण्याचे प्रकार अद्यापही सुरुच
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिल्यानंतरही पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये शेतातील गवत जाळण्याचे प्रकार घडत आहेत, असे दिसून येत आहे. गवत जाळणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात त्वरित कारवाई करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा या राज्यांना दिला होता. तथापि, अद्यापही या राज्यांनी म्हणावी तशी कारवाई केलेली नाही, असे पहावयास मिळाले आहे.
खरीप हंगामातील पिकांची कापणी झाल्यानंतर उरलेले गवत जाळण्याची प्रथा पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये प्रामुख्याने आहे. असे गवत जाळून भूमीची रबी पिकांसाठी मशागत केली जाते. मात्र, या गवताचा धूर वाऱ्यासमवेत दिल्ली शहरात पसरतो आणि दिल्लीमध्ये वायूप्रदूषणाची पातळी धोकादायक बनते असे दिसून आले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयलाने या प्रकरणाची दखल घेऊन केंद्र सरकार आणि ही दोन राज्यसरकारे यांना इशारा दिला होता. सध्या पंजाब आणि हरियाणा या राज्यांच्या सीमावर्ती भागांमध्ये गवत जाळले जात आहे. त्यामुळे दिल्ली शहरात मोठ्या प्रमाणात धूर जमा होऊ लागला आहे. गवत जाळण्याची प्रक्रिया आणखी 15 दिवस चालणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या दिल्लीची प्रदूषण पातळी ‘अतिशय खराब‘ स्थितीत पोहचली आहे. न्यायालयाने या प्रकरणी पंजाब आणि हरियाणा राज्यांकडून अहवाल मागविला आहे.