गुन्हेगारीचा आलेख चढता अन् हैराण झालीय जनता
तीन वर्षांतील मोजक्याच घरफोड्यांचा तपास : स्थानिक तसेच परप्रांतीय गुन्हेगार सक्रिय, शहर-उपनगरात उच्छाद
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. स्थानिक गुन्हेगारांबरोबरच परप्रांतीय गुन्हेगारही शहरात सक्रिय असल्याचा संशय आहे. गुन्हेगारांनी बंद घरांना लक्ष्य बनविले असून पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांतील चोऱ्या, घरफोड्यांची आकडेवारी लक्षात घेता अनेक चढउतार दिसून येतात. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी 26 जानेवारीपासून चोऱ्या, घरफोड्या थोपविण्यासाठी ‘लॉक्ड हाऊस’ या बंद घरांवर लक्ष ठेवणारा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमानंतर चोऱ्या, घरफोड्या थोपविण्यासाठी पोलीस बंद घरांना भेटी देत आहेत. यासाठी घराला कुलूप लावून परगावी जाण्यापूर्वी पोलीस दलाच्या
व्हॉट्सअॅप नंबरवर संबंधितांना त्याची माहिती देऊन लोकेशन पाठवायचे आहे. त्यानंतर अधूनमधून पोलिसांच्या फेऱ्या सुरू होतात. हा उपक्रम काही दिवसांसाठी परगावी जाणाऱ्यांना दिलासादायक आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता काही दिवसांसाठी नव्हे तर केवळ एक-दोन तासांसाठी घराला कुलूप लावून बाहेर जाणेही धोक्याचे ठरले आहे. घराबाहेर पडल्यानंतर केवळ एक-दोन तासातच गुन्हेगार बंद घरांचा कडीकोयंडा तोडून सोन्या-चांदीचे ऐवज लांबवत आहेत. तालुक्यातील गावे, उपनगरांबरोबरच मध्यवर्ती भागातील घरांनाही चोरट्यांनी लक्ष्य बनविले आहे.
मठ गल्ली येथील प्रकाश खोत हे 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता आपल्या घराला कुलूप लावून कूपनलिका खोदण्यासाठी चन्नम्मानगर येथील नव्या बांधकामावर गेले होते. सायंकाळी 7 वाजता घरी परतले. त्यावेळी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 50 ग्रॅम सोने व 20 ग्रॅम चांदीचे दागिने पळविल्याचे उघडकीस आले. अमननगर येथील इरफान मालदार यांच्या घरातून 44 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविले आहेत. शुक्रवार दि. 27 फेब्रुवारी रोजी ही घटना उघडकीस आली. गुरुवारी रात्री कामानिमित्त आपल्या घराला कुलूप लावून कुटुंबीयांसमवेत ते बाहेर गेले होते. शुक्रवारी सकाळी घरी परतले, त्यावेळी त्यांच्या घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. सदाशिवनगर येथील एका डॉक्टरच्या घरीही चोरी झाली आहे.
गुन्हेगारांच्या धुडगूसमुळे बेळगावकर हैराण
एकीकडे सायबर गुन्हेगारांचा हैदोस तर दुसरीकडे चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांचा धुडगूस यामुळे बेळगावकर हैराण झाले आहेत. चोऱ्या, घरफोड्या नित्याच्याच झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी लक्षात घेता थोड्या प्रमाणात चढउतार दिसून येतो. तीन वर्षांत 75 दिवसा घरफोड्या, 294 रात्रीच्या घरफोड्या, 30 चोऱ्या व 726 भुरट्या चोऱ्या असे एकूण 1 हजार 125 हून अधिक गुन्हे घडले आहेत.
यापैकी केवळ काही चोरी प्रकरणांचाच तपास झाला आहे. अनेक प्रकरणांचे तपास सुरू आहेत. गेल्या वर्षी 28 दिवसा घरफोड्या, 78 रात्रीच्या घरफोड्या, 12 चोऱ्या व 211 भुरट्या चोऱ्या झाल्या आहेत. 31 डिसेंबर 2025 पर्यंतची ही आकडेवारी आहे. चोऱ्यांबरोबरच जनावरे चोरी प्रकरणातही वाढ झाल्याचे दिसून येते. दरोडे प्रकरणामध्येही चढउतार दिसून येतात. 2023 मध्ये 1 तर 2024 मध्ये 3 आणि गेल्या वर्षी 2 दरोडे पडल्याचे पोलीस दफ्तरी नोंद आहे.
चोऱ्या, घरफोड्यांमध्ये केवळ स्थानिक गुन्हेगारच सहभागी आहेत असे नाही. शेजारच्या गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेशमधून येऊन बेळगावात गुन्हे करणाऱ्या टोळ्या आहेत. दोन वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील एका गुन्हेगाराने वडगाव, खासबाग, अनगोळ परिसरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्याने अनेक गुन्हे केले आहेत. त्याच्याविषयी संपूर्ण माहितीही टिळकवाडी पोलिसांना मिळाली होती. मात्र, या दोन वर्षांत त्याच्यापर्यंत पोहोचणे पोलीस यंत्रणेला शक्य झाले नाही. अनेक आंतरराज्य गुन्हेगार पोलीस दलासमोर आव्हान उभे करतात.
गोव्यातील प्रकाश पाटील याच्याही अधूनमधून बेळगावला फेऱ्या असतात. यापूर्वीही अनेक वेळा बेळगाव ग्रामीण व शहरातील इतर पोलिसांना तो सापडला होता. तो मूळचा बेळगावचा. एकदा तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला तर मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले जातात. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या बॅग व दागिने चोरण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही प्रकरणात बेळगाव निपाणी येथील महिलांना अटक झाली आहे. तर काही प्रकरणांचा तपास अद्याप लागलेला नाही.
फायनान्स कंपनी-पोलिसांसमोर कारवाईसाठी मोठे प्रश्नचिन्ह
चोऱ्या, घरफोड्या प्रकरणातील गुन्हेगारांना अटक केल्यानंतर त्यांच्याजवळून चोरी प्रकरणातील दागिने जप्त करण्याचे मोठे आव्हान असते. अत्यंत कमी किमतीत त्यांची विक्री केलेली असते. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अनेक सराफी व्यावसायिक चोरीचे सोने खरेदी करण्यास कचरत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांनी नवा मार्ग अनुसरला आहे. चोरीचे दागिने फायनान्समध्ये ठेवून मोठे कर्ज उचलले जाते. जर पोलिसांच्या तावडीत सापडले तर दागिने ठेवलेल्या फायनान्सचे नाव सांगितले जाते. फायनान्स कंपनीचालक व पोलीस या दोघांसमोरही कारवाईसाठी मोठे प्रश्नचिन्ह उभे होते.
चोरीचे सोने फायनान्स कंपनीमध्ये गहाण
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून गहाण ठेवलेले दागिने जप्त करावे लागतात. अलीकडच्या एक-दोन वर्षात चोरीप्रकरणी अटक केलेल्या अनेक गुन्हेगारांनी दागिने आपल्या मित्रांच्या किंवा कुटुंबीयांच्या नावे फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवल्याचे उघडकीस आले आहे. चोऱ्या, घरफोड्या थोपविण्यासाठी पोलीस दलाकडून सतत उपाययोजना सुरू असूनही गुन्हेगारांनी त्यांच्यासमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे. एखाद्या गुन्ह्यानंतर पोलिसांचा तपास कसा चालतो, याची माहिती गुन्हेगारांना चांगलीच अवगत झालेली असते. त्यामुळे पोलिसांना चकविण्यासाठी त्यांची धडपड असते. घटनास्थळावर ठशांचे नमुने मिळू नयेत, इतर कोणत्याही प्रकारचे पुरावे सापडू नयेत याची खबरदारी घेत गुन्हेगार चोऱ्या करत आहेत.
प्रत्येकाने आपल्या मालमत्तेची खबरदारी घेण्याची गरज
अलीकडच्या काही महिन्यांमध्ये सोन्याची दरवाढ सातत्याने सुरूच आहे. त्यामुळेच चोऱ्या वाढल्याचे दिसून येते. 10 ग्रॅमचा दागिना जरी चोरट्यांच्या हाती लागला तर त्याची किंमत दीड लाखांच्यावर असते. त्याच्यावर निम्मे कर्ज मिळते. गांजासह अमलीपदार्थांचे व्यसन, चैनीचा नाद, कॅसिनो व जुगाराचा नाद आदी व्यसनाधिनतेमुळे गुन्हेगार चोऱ्या करताना दिसत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते अनेक वेळा कपाटाच्या चाव्या त्यालाच सोडून दिलेल्या असतात. त्यामुळे गुन्हेगारांना ऐवज लांबविणे अत्यंत सुलभ होते. त्यामुळे चोऱ्या, घरफोड्या थोपविण्यासाठी केवळ पोलिसांचीच जबाबदारी नाही तर प्रत्येकाने आपल्या मालमत्तेची खबरदारी घेण्याची गरज आहे.