For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नांतून कोट्यावधींचे अनुदान

10:56 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नांतून कोट्यावधींचे अनुदान
Advertisement

मंगला अंगडी यांनी वाचला विकासकामांचा पाढा : विरोधकांच्या आरोपांना दिले प्रत्युत्तर

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा मागील 20 वर्षांत विकास झाला नसल्याचे बालिश वक्तव्य विरोधकांनी केले आहे. परंतु, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांनी मागील 20 वर्षांत 16 हजार कोटींचे अनुदान आणून बेळगावचा विकास केला आहे. काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर हे बालिश वक्तव्य करत असल्याचा आरोप खासदार मंगला अंगडी यांनी केला. सोमवारी खासदार मंगला अंगडी यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश अंगडी यांनी केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या 927 कोटी रुपयांच्या रेल्वेमार्गाला केंद्राची परवानगी,शहरासाठी 100 कोटी रुपये मंजूर करून चार रेल्वे ओव्हरब्रिजची निर्मिती, 210 कोटी रु. निधीतून रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण, 3600 कोटी निधीतून रेल्वेमार्गाचे दुपदरीकरणासाठी अंगडी यांनी प्रयत्न केले.

सुरेश अंगडी यांचा बेळगावच्या विकासात सिंहाचा वाटा असताना विरोधकांकडून 20 वर्षांत निधी आणला नाही, असा पूर्णत: चुकीचा प्रचार केला जात आहे. पराभव समोर दिसू लागल्यानेच हेब्बाळकर यांच्याकडून चुकीची वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे कोणत्याही नेत्याचा अवमान होणार नाही, याची काळजी विरोधकांनी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी काँग्रेसवर निशाणा साधत भाजपच्या कार्यकाळातच शहराचा विकास झाल्याचे सांगितले. स्मार्टसिटी, बेळगावला राणी चन्नम्मा विद्यापीठ, आंबेडकर भवन, विमानतळाचा विस्तार आदी मोठे प्रकल्प अंगडी यांच्यामुळेच बेळगावला येऊ शकले. त्यामुळे काँग्रेसला टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक हनुमंत कोंगाली उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.