For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खूशखबर! राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 165 कोटी

12:29 PM Apr 29, 2025 IST | Snehal Patil
खूशखबर  राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 165 कोटी
Advertisement

योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4 कोटी 97 लाख 61 हजार 87 रुपये अनुदानाचा लाभ मिळणार

Advertisement

By : जालंदर पाटील

कोल्हापूर (चुये) : अल्पमुदत पीक कर्जाची उचल करून विहित मुदतीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून 165 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. हा निधी वितरणाचे आदेश राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. या योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4 कोटी 97 लाख 61 हजार 87 रुपये अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

Advertisement

शेतकऱ्यांना प्रतिवर्षी विविध पीक उत्पादनासाठी विकास सेवा संस्था आणि इतर अधिकृत बँकांतून 6 टक्के व्याजदराने अल्पमुदत पीक कर्ज वाटप केले जाते. वाटप केलेले पीक कर्ज नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने 1988 मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना सुरू केली. या योजनेतून प्रतिवर्षी 3 लाख रूपयांपर्यंत उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 टक्के व्याज सवलत अनुदान दिले जाते. त्याप्रमाणे राज्यातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून व्याज सवलत मागणी प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवले जातात. त्यानंतर अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद करून ही रक्कम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे वितरणासाठी पाठवली जाते.

सन 2024 -25 या आर्थिक वर्षामध्ये राज्याच्या अर्थसंकल्पात या व्याज सवलत योजना अनुदानासाठी 300 कोटीची तरतूद केली आहे. त्याप्रमाणे 2024-25 या आर्थिक वर्षातील शेतकऱ्यांच्या उचल पीक कर्जाच्या व्याज सवलतीचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडून सहकार आयुक्तांकडे सादर केले होते, त्याप्रमाणे23 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देऊन 165 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या व्याज सवलत अनुदान वितरणाचा आदेश राज्याच्या सहकार आयुक्तांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयांना दिला आहे.

सर्वाधिक 30 कोटी पुणे जिल्ह्यातसर्वात कमी 18 लाख नंदुरबारला राज्यात व्याज सवलतीचा सर्वाधिक लाभ 30 कोटी रुपये पुणे जिल्ह्याला झाला आहे तर सर्वात कमी लाभ 18 लाख रूपये नंदूरबार जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. प्रतिवर्षी व्याज सवलतीचा लाभ सुरु झाला डॉ. देशमुख व्याज सवलत योजना सुरू झाल्यापासून पहिली काही वर्षे नियमित व्याज सवलत मिळाली, मात्र त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद केल्यानंतर उपलब्ध निधीचा विचार करून ही व्याज सवलत दोन ते चार वर्षे प्रलंबित पडत होती.

त्यामुळे शेतकऱ्यांना नियमित परतफेड करूनसुद्धा व्याज सवलत वेळेवर मिळत नव्हती. अलीकडच्या 10 वर्षांत या योजनेतून शेतकऱ्यांना हा लाभ प्रतिवर्षी मिळू लागला आहे. कारण अर्थसंकल्पात भरीव तरतूद यासाठी केली जाऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उचल पीक कर्जावर व्याज सवलतीच्या रूपाने प्रतिवर्षी लाभ मिळत आहे

राज्य अर्थसंकल्पात तरतुदीनुसार जिल्हानिहाय व्याजसवलत अशी

कोल्हापूर 4 कोटी 97 लाख 61,087,  पुणे 30 कोटी, सातारा 15 कोटी, सांगली 10 कोटी, ठाणे 22 लाख, रत्नागिरी 57 लाख, 79,421, सिंधुदुर्ग 1 कोटी 81 लाख 76,608, नाशिक 5 कोटी 7 लाख 17,230, नंदुरबार 18 लाख, अहिल्यानगर 25 कोटी 56 लाख 28,692, . संभाजीनगर 4 कोटी 82 लाख, जालना 27 लाख 27,119, परभणी 1 कोटी 93 लाख 20,145, हिंगोली 3 लाख, लातूर 20 कोटी 34 लाख 23,546, नांदेड 5 कोटी 31 लाख, अमरावती 9 कोटी 10 लाख, अकोला 2 कोटी 52 लाख, वाशिम 10 कोटी 45 लाख, यवतमाळ 14 कोटी

लाभ कोणाला

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून विकास सेवा संस्थांकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड 30 जूनपूर्वी केलेली पाहिजे. तसेच जिल्हा बँकेशिवाय अन्य बँकांकडून घेतलेले कर्जाची उचल तारखेपासून 365 दिवसांपूर्वी परतफेड करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.

Advertisement
Tags :

.