काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ९७ लाखाचे अनुदान मंजूर
सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग ,कोल्हापूर ,रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी तब्बल ४ कोटी ९७ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. हे अनुदान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे . शासनाने एकूण ५१८५ अर्जांपैकी पात्र ठरलेल्या ४१९६ शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ९७ लाख ४६ हजार ११ रुपयांचे (रु. ४९७.४६११ लाख) अनुदान मंजूर केले आहे.या योजनेअंतर्गत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक २०२० शेतकऱ्यांना २ कोटी ३४ लाख १३ हजार रुपयांचे (रु. २३४.१३ लाख) अनुदान मिळणार आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील १६९६ शेतकऱ्यांना १ कोटी ९१ लाख ५७ हजार ११ रुपयांचे (रु. १९१.५७११ लाख) आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ४८० शेतकऱ्यांना ७१ लाख ७६ हजार रुपयांचे (रु. ७१.७६ लाख) अनुदान मंजूर करण्यात आले आहे. दिनांक २४ मार्च २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार २७४१ लाभार्थ्यांसाठी ३ कोटी ३६ लाख ५१ हजार रुपये आणि दिनांक २८ मार्च २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार १४५५ लाभार्थ्यांसाठी १ कोटी ६० लाख ९५ हजार रुपये मंजूर करण्यात आले.विशेष म्हणजे, हे संपूर्ण अनुदान दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य काजू परिषदेच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. आता, दिनांक ४ एप्रिल २०२५ पासून या अनुदानाची रक्कम थेट ४१९६ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. उर्वरित ९८९ अर्जांमधील त्रुटींची पूर्तता करण्याचे काम सध्या सुरू असून, लवकरच या शेतकऱ्यांनाही अनुदानाचा लाभ मिळेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.