दोन हजार नवीन बसेस खरेदीसाठी 130 कोटीचे अनुदान मंजूर
वाहतूक खात्याचे मंत्री रामलिंगा रेड्डी यांची माहिती
कारवार : कर्नाटक राज्य सरकारने 2 हजार नवीन बसेस खरेदी करण्यासाठी 130 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे, अशी माहिती वाहतूक खात्याचे मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिली. ते शिर्सी येथे नवीन बसस्थानक आणि आरटीओ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळासाठी पुढील महिन्यात 300 नवीन बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. राज्यातील 6 जिल्ह्यांचा समावेश होत असलेल्या वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळासाठी अतिरिक्त 400 बसेससह एकूण 700 बसेस उपलब्ध करून दिल्या जातील. राज्यातील काँग्रेस सरकारने अंमलात आणलेल्या 5 गॅरंटीपैकी एक असलेली शक्ती योजना सुरू होऊन एक वर्ष दहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे.
या कालावधीमध्ये राज्यातील 465 कोटी महिलांनी मोफत प्रवासाचा लाभ उठविला आहे. गेल्या 4 वर्षांपासून परिवहन मंडळाकरिता नवीन बसेस खरेदी न केल्यामुळे त्रास सहन करावा लागला आहे. राज्यातील 4 परिवहन मंडळामध्ये एकूण 9 हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल. यापैकी 1 हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक वायव्य कर्नाटक परिवहन मंडळामध्ये करण्यात येईल. एकूण 9 हजार कर्मचाऱ्यांपैकी 1 हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक अनुकंपा आधारावर करण्यात येईल,अशी माहिती मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिली. यावेळी यल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बार, शिर्सीचे आमदार भीमाण्णा नाईक, कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया आदी उपस्थित होते.