गणेशमूर्ती कलाकारांना एक कोटीचे अनुदान प्रदान
हस्तकला महामंडळ अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांची माहिती
पणजी : चिकणमातीपासून गणपतीची मूर्ती तयार करणाऱ्या 300 पेक्षा अधिक कलाकारांना मिळून सुमारे रु. 1 कोटीचे अनुदान वितरित केल्याची माहिती हस्तकला लघुउद्योग महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली. महामंडळाच्या पणजीतील कार्यालयात हा अनुदान वितरित करण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अजय गावडे व इतर हजर होते. हे अनुदान बहुतेक कलाकारांच्या थेट बँक खात्यात जमा झाले असून काहीजणांना इतर कार्यक्रमात धनादेश देण्यात आले. गोवा राज्यात मूर्ती कलाकारांची संख्या वाढावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. अनुदान वाटप हा त्याचाच एक भाग आहे.
कलाकारांनी कलेचा वापर स्वत:च्या उत्पन्न वाढीसाठी करावा आणि स्वत:च्या पायावर उभे राहावे. सरकारी नोकरीच्या मागे लागू नये. सर्वांना सरकारी नोकरी मिळणे शक्य नाही. गोव्यातील कलाकारांचे जीवन सुसह्य व्हावे म्हणून सरकार प्रयत्न करते, असे आर्लेकर यांनी त्यावेळी नमूद केले. कलाकारांना त्यांच्या कलाकृतींसाठी बाजारपेठ देण्याचे काम महामंडळ करणार असून कलाकृती विकल्या नाहीत तर महामंडळ त्या विकत घेऊन त्यांना त्याचा मोबदला देणार असल्याचे आर्लेकर म्हणाले. पर्यावरण राखण्यासाठी चिकणमातीच्या मूर्ती तयार करा, पीओपी मूर्ती नकोत. त्या मूर्तीवर गोव्यात बंदी घालून त्या रोखण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महामंडळास कारवाईचे अधिकार नाहीत पण प्रदूषण मंडळ याप्रकरणी दखल घेऊन कारवाई करणार असल्याचे आर्लेकर म्हणाले.