For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तू बुद्धी दे...

06:51 AM Sep 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
तू बुद्धी दे
Advertisement

मांगल्य आणि चैतन्याचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला देशभर हर्षोल्हासात प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवसापासूनच ठिकठिकाणी भक्तीचा गजर आणि ओसंडून वाहणारा उत्साह पहायला मिळत असून, आता पुढचे दहा दिवस खऱ्या अर्थाने गणेशमय असतील. अर्थात या काळात उत्सवाचे पावित्र्य राखणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असेल. बाप्पाची आगमनावेळी जी प्रगल्भता दाखवली गेली, तीच पुढच्या टप्प्यात विशेषत: विसर्जनाच्या दिवशी दाखविली जाईल, हीच अपेक्षा असेल.

Advertisement

सार्वजनिक गणेशोत्सवाला अलीकडच्या काळात अतिशय भव्यदिव्य स्वरुप प्राप्त झाले आहे. किंबहुना लोकमान्य टिळक, भाऊसाहेब रंगारी यांसारख्या महनीयांचा गणेशोत्सवामागील उद्देश अत्यंत व्यापक असा होता. टिळकांनी या उत्सवाला सामाजिक ऐक्याची, राष्ट्र निर्माणाची व जनजागरणाची जोड दिली. स्वाभाविकच समाजाला संघटित करण्याकरिता हा उत्सव म्हणजे एक प्रभावी माध्यम ठरले. मागच्या शे, सव्वाशे वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्यालाही आता आठ दशके होत आहेत. या काळात गणेश मंडळांमार्फत झालेले कार्यही उल्लेखनीय म्हणता येईल. विविध मंडळे आजही अनेकविध लोककल्याणकारी वा समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मात्र, मागच्या काही वर्षांत उत्सवामध्ये काही अनिष्ट बाबीही शिरलेल्या दिसतात. डीजे, लेझर संस्कृती हा त्याचाच भाग. लेझरमुळे अंधत्व आल्याची वा डीजेमुळे कर्णबधिरत्व आल्याची कितीतरी उदाहरणे सापडतात. त्यातून हळूहळू का होईना सामाजिक शहाणपण येत असेल, तर ते चांगले लक्षण म्हणावे लागेल. मागच्या काही दिवसांपासून डीजेच्या दणदणाटाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील विद्यानंद बापट यांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर डीजेविरोधी चळवळ गतिमान झालेली दिसते. बापट यांच्या एकूणच वैचारिक मांडणीबद्दल मतमतांतरे असली, तरी डिजेविरोधातील त्यांचा मुद्दा रास्तच आहे. त्यामुळे नागरिकांनंतर काही मंडळांकडूनही याबाबत मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आशास्पद म्हणता येईल. या वर्षी दहीहंडीमध्येही डीजे वाजले. नाहीच असे नाही. परंतु, तुलनेत त्यांचा आवाज काहीसा खाली आल्याचे दिसले. गणरायाचे आगमन पूर्वीपासून वाजतगाजत व थाटामाटात करण्याची परंपरा आहे. मधल्या काळात यालाही कर्कश स्वरूप देण्याची स्पर्धा सुरू झाली. मात्र, या वर्षी अनेक शहरांमध्ये या कर्णकर्कशतेला फाटा दिल्याचे चित्र सुखावह होय. पारंपरिक वाद्ये ही निश्चितपणे आनंददायी असतात. परंतु, पथकातील सदस्यांच्या संख्येचा अतिरेक झाला, तर ही वाद्येही कर्कशतेच्या वळणावर जातात. हे पाहता पथकातील सदस्यांवर मर्यादा ठेवण्याच्या दृष्टीने पडलेली स्वयंस्फूर्त पावले, हीदेखील एक चांगली बाब म्हणावी लागेल. किंबहुना, हेच विसर्जन मिरवणुकीत पहायला मिळावे, अशीच सजग नागरिकांची व भक्तांची अपेक्षा असेल. पुण्यामुंबईसह इतर शहरांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह काही औरच असतो. ही ऊर्जा अनुभवणे हा संस्मरणीय अनुभवच. मात्र, दरवर्षीचा उत्साह कायम राखतानाच आवाजाची मर्यादा पाळली गेली, तर गणेशोत्सव खऱ्या अर्थाने आनंददायी व चैतन्यदायी होऊ शकतो. पुण्यासारख्या शहरात मंडळे अतिशय सुंदर पद्धतीने देखाव्यांचे सादरीकरण करतात. चालू घडामोडींवर भाष्य वा सामाजिक संदेश देण्यात अनेक मंडळे अग्रेसर असतात. या देखाव्यांमधील प्रयोगशीलता, सर्जनशीलता वा तंत्रज्ञान हा तर उत्कृष्टतेचा आविष्कारच ठरावा. यंदाही कितीतरी मंडळांनी आपली क्रिएटिव्हीची परंपरा कायम राखली आहे. हे समाधानकारकच. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबद्दल मागच्या काही वर्षांपासून चर्चा सुरू आहे. मुळात पर्यावरण हा आपला श्वास आहे. हे पाहता इको फ्रेंडली उत्सव ही काळाची गरजच. डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी सोलापूर, नागपूरसह अनेक शहरांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत टप्प्याटप्प्याने तयार होत असलेली मानसिकता लक्षात घेता आगामी काळात अन्य शहरांकडून याचे अनुकरण होईल, यात कोणतीही शंका वाटत नाही. मुळात विघ्नहर्ता गजानन ही बुद्धीदेवता आहे. त्यामुळे अलीकडे गडद होत चाललेली बेरोजगारी, महागाई, दुष्काळ ही संकटे विघ्नहर्त्याने दूर करावीत. तसेच दणदणाटाऐवजी प्रत्येक उत्सव संयमाने, शांततेने व सुरेलपणाने साजरा करण्याची बुद्धी आम्हा सर्वांस प्रदान करावी, हीच गणरायाचरणी प्रार्थना.

Advertisement
Advertisement
Tags :

.