वडगाव-जांबोटी गावाला स्मशानभूमीसाठी जागा मंजूर करा
ग्रामस्थांच्यावतीने खानापूरचे उपतहसीलदार संगोळी यांना निवेदन
वार्ताहर/जांबोटी
वडगाव-जांबोटीला स्मशानभूमीसाठी जागा मंजूर करावी, अशा मागणीचे लेखी निवेदन वडगाव ग्रामस्थांच्यावतीने नुकतेच खानापूरचे उपतहसीलदार संगोळी यांना देण्यात आले आहे. जांबोटी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वडगाव-जांबोटी गावची लोकसंख्या सुमारे 800 च्या घरात आहे. मात्र गावाला स्वतंत्र स्मशानभूमी नसल्यामुळे या गावच्या नागरिकांची अंत्यसंस्कारावेळी मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे. वडगावच्या आजूबाजूला खासगी सर्व्हे नंबर तसेच वनखात्याचे राखीव जंगल आहे. मात्र स्मशानभूमीसाठी गावच्या जवळपास सरकारी जागा उपलब्ध नसल्यामुळे गावात एखादी व्यक्ती मयत झाल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मलप्रभा नदीजवळ वनखात्याच्या जमिनीत करण्यात येते. मात्र त्या ठिकाणी जाण्यासाठी साधा रस्तादेखील नाही. तसेच अंत्यसंस्कार करण्यासाठी निवारा शेडदेखील नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
यासाठी गावाला समशानभूमीची अत्यंत आवश्यकता आहे. निवेदनात म्हटले आहे की, वडगाव-जांबोटी गावच्या हद्दीत जांबोटी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व्हे नंबर 239 च्या बाजूला असलेली सर्व्हे नंबर 240 ही जागा राखीव वनक्षेत्र म्हणून नोंद असून सदर 240 सर्व्हे नंबरमधील दहा गुंठे जमीन वडगाव-जांबोटी गावासाठी सार्वजनिक स्मशानभूमीसाठी दान करण्याची विनंती, खानापूर उपतहसीलदारांना करण्यात आली आहे. सदर जागा स्मशानभूमीसाठी मंजूर करण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून होणारी गैरसोय दूर करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी बळवंत इंगळे, पावणाप्पा देसाई, मुरारी देसाई, दत्तात्रय इंगळे, प्रभाकर दळवी, सुरेश देसाई यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. निवेदनाच्या प्रति बेळगाव जिल्हाधिकारी व जांबोटी ग्रा.पं.ला सुद्धा पाठविण्यात आल्या.