आमदार आसिफ सेठ यांना मंत्रिपद द्या
कित्तूर कर्नाटक मुस्लीम महासंघाची मागणी
बेळगाव : कर्नाटक राज्याच्या नवीन मंत्रिमंडळामध्ये बेळगाव उत्तरचे आमदार राजू उर्फ आसिफ सेठ यांना मंत्रिपद देण्यात यावे, यामुळे बेळगाव शहरासह जिल्ह्याच्या विकासाला नवीन गती मिळणार आहे. उत्तर कर्नाटकातील मुस्लीम समाज हा पूर्णत: सेठ यांच्या पाठीशी उभा असून राज्य सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी कित्तूर कर्नाटक विभागातील मुस्लीम समुदाय गटाच्या महासंघाने पत्रकार परिषदेद्वारे केली. मंगळवारी अंजुमन ए इस्लामच्या सभागृहात उत्तर कर्नाटकातील महत्त्वाच्या मुस्लीम नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मंत्रिपदाचा ठराव मंजूर करण्यात आला. आमदार सेठ यांना मंत्रिपद मिळावे यासाठी फेडरेशनचे एक शिष्टमंडळ लवकरच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात आले. त्याचसोबत नवे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनाही निवेदन देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्रिपद द्या
माजी आमदार फिरोज सेठ यांनी दोनवेळा बेळगाव उत्तरचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यावेळीही मुस्लीम समाजाने मंत्रिपद देण्याची मागणी केली होती. किमान यावेळीतरी ती मागणी पूर्ण व्हावी. तसेच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना केपीसीसीचे अध्यक्षपद तसेच उपमुख्यमंत्रिपद देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेवेळी मुडलगी येथील लालासाब सिद्धापूर, रायबाग येथील इरफान तरडे, खानापूर येथील सलीम बोलमनी, रियाज पटेल, कुडची येथील हाफिज मुबारक यांच्यासह बेळगाव जिल्ह्यातील मुस्लीम समाजाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.