आजीच्या घरात चोरी...नातवाचीच लुटमारी
कौजलगी सोने चोरी प्रकरणाचा दोन दिवसांत तपास : 18 लाखांचे दागिने जप्त
बेळगाव : कौजलगी (ता. गोकाक) येथील चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे. चोरीच्या घटनेनंतर दोन दिवसांत आरोपीला अटक करण्यात आली असून आजीच्या घरात चोरी करून नातवाने लुटमारीचा आव आणल्याचे उघडकीस आले आहे. एका तरुणाला अटक करून त्याच्याजवळून 18 लाख 15 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. लोकेश बसवराज दळवाई (वय 24) राहणार कौजलगी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी डी. नायक, मुडलगीचे पोलीस निरीक्षक श्रीशैल ब्याकोड, कौजलगीचे पोलीस उपनिरीक्षक आनंद बी., व्ही. व्ही. उत्तरेश्वर यांनी ही कारवाई केली आहे. शुक्रवार दि. 6 जून रोजी मध्यरात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास पार्वतेव्वा तम्माण्णा हळ्ळूर, राहणार कौजलगी यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर चोरीची घटना घडली होती.
बेडरूममधील कपाट फोडून 18 लाख 15 हजार रुपये किमतीचे 191 ग्रॅम सोन्याचे दागिने 35 ते 40 वर्षीय चोरट्यांनी पळविल्याचा एफआयआर दाखल करण्यात आला होता.दागिने पळविताना चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकेश दळवाई याच्यावर चाकू हल्ला करून त्याला मारहाण केल्याचे सांगण्यात आले होते. जखमी लोकेशवर उपचार करण्यात आले होते. मात्र, लोकेश हाच चोर निघाला आहे. आपल्याच आजीच्या घरी 191 ग्रॅम दागिने चोरून तिघा अज्ञात चोरट्यांनी हे कृत्य केल्याचे त्याने भासवले होते. उपलब्ध माहितीनुसार लोकेश हा नात्याने पार्वतेव्वा यांचा नातू लागतो. लहानपणापासून तो त्यांच्याच घरी राहतो. पार्वतेव्वा यांनी त्याचा सांभाळ केला आहे. आजीचे दागिने किती आहेत आणि ते कोठे आहेत, याची पुरेपूर माहिती त्याला होती. चैनीसाठी स्वत:च आजीचे दागिने चोरून चोरट्यांनी जाता जाता आपल्यावर चाकू हल्ला केल्याचा आव त्याने आणला होता. शेवटी पोलिसांनी चोर बाहेरचे नसून घरातलाच आहे, हे लक्षात येताच लोकेशला अटक करून त्याने आपल्याच आजीच्या घरातून चोरलेले दागिने जप्त केले आहेत.
जिल्हा पोलीसप्रमुखांकडून पोलीस पथकाचे कौतुक
गोकाकच्या पोलीस उपअधीक्षकपदी रुजू झाल्यानंतर रवी डी. नायक यांनी चोरी प्रकरणांच्या तपासाचा सपाटा सुरू केला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संकेश्वर पोलिसांनी मोबाईल चोरीचा छडा लावला होता. गोकाक ग्रामीण पोलिसांनीही मिडकनट्टीतील चोरी प्रकरणी बैलहोंगल तालुक्यातील जोडगोळीला अटक करून साडेसात लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आता कौजलगी येथील चोरी प्रकरणाचाही छडा लावण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.