विमानाच्या पंखावर आजी
ब्रिटनमधील 99 वर्षांच्या आजीबाईंनी एक अद्भूत विक्रम केला आहे. उडत्या विमानाच्या पंखांवर उभे राहून त्यांनी हा विश्वविक्रम केला. या आजीबाईंचे नाव हेल्गा डफी असे आहे. अशा प्रकारच्या कृतीला ‘विंग वॉकिंग असे म्हणतात. हा एक प्रकरचा धाडसी खेळ किंवा स्टंट असून त्यात व्यक्ती सेफ्टीबेल्टस्च्या आधारे उडत्या विमानाच्या पंखांवर उभी राहून काही काळ प्रवास करते. काही काळापूर्वी असाच विक्रम 97 वर्षांच्या बेट्टी ब्रोमेज यांनी केला होता. ब्रोमेज यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी हा विक्रम केला आहे, असे हेल्गा डफी यांनी विक्रमानंतर स्पष्ट केले. डफी या सध्या विल्टशायर येथील एका आश्रमशाळेत वास्तव्य करतात. त्यांनी हा विक्रम रेडकाँब येथील विमातनळ परिसरात केला. पूर्वनिर्धारीत कार्यक्रमानुसार हा विक्रम 23 सप्टेंबर 2026 या दिवशी त्यांच्या 99 वाढदिवसाच्या निमित्ताने होणार होता. तथापि, काही कारणामुळे तो त्या दिवशी होऊ शकला नाही. त्यामुळे तो काही दिवसांच्या नंतर करण्यात आला. हा साहसी खेळ खेळल्याने डफी यांना 1 लाख 40 हजार रुपयांची प्राप्ती झाली आहे. विक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या स्टंटचा हेतू आणि अविस्मरणीय अनुभवांचे कथन केले आहे.
उडत्या विमानाच्या पंखांवर उभे राहताना मला कोणतीही भीती वाटली नाही. उलट अत्यंत रोमांचक अनुभव आला. तो मी जन्ममर विसरणार नाही. काहीतरी साहसी कृत्य करण्याची माझी अतिशय मोठी इच्छा होती. ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी हा निर्णय घेतला, असे प्रतिपादन त्यांनी केले. ज्या विमानाच्या पंखांवर त्या उभ्या राहिल्या, त्ˆr एक एअर अँब्युलन्स, अर्थात विमान रुग्णवाहिका होती. या विमानात त्यांची पुतणी आणि अन्य एक नातेवाईही होते. वयाच्या 99 व्या वर्षीही असे साहस करता येते, हा संदेश त्यांचा द्यायचा होता. म्हणून त्यांनी हा साहसिक खेळ केला, असे त्यांच्या पुतणीने नंतर स्पष्ट केले. आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो, अशा शब्दांमध्ये पुतणीने त्यांचे कौतुक केले. डफी यांचे इतर आप्तस्वकीय आणि त्यांचे परिचित यांनीही या विक्रमासाठी त्यांचे अभिनंदन केले आहे. सोशल मिडियावरही त्यांच्या या विक्रमाची प्रशंसा करण्यात येत असून त्यांच्यापासून साऱ्यांनी सकारात्मक प्रेरणा घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया येत आहे.