श्री राम जन्मभूमी मंदिर अयोध्या लोकार्पण निमित्ताने उद्या कडेगाव शहरात भव्य शोभायात्रा
कडेगांव प्रतिनिधी
495 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्ष व प्रतीक्षेनंतर अयोध्या येथे श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण होवून उद्या त्यात माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदींच्या सह निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते बाल श्री राम यांची प्रतिष्ठापणा होत आहे. देशातील व जगातील सर्व हिंदूंच्या दृष्टीने हा परम भाग्याचा क्षण आहे.. कडेगाव शहरात सुद्धा सकल हिंदू समाजाच्या वतीने या निमित्ताने उद्या सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून शहरातील जैन, मुस्लिम सह सर्व धर्मीय बांधवांचे यासाठी मोठे सहकार्य लाभले आहे. या निमित्ताने संपूर्ण कडेगाव शहरात ठिकठिकाणी भगवे ध्वज, पताका, विविध मंडळे, संस्था यांनी उभारलेले प्रभू श्री राम यांचे डिजिटल फलक यामुळे सर्व वातावरण उत्साहाने भरून गेले आहे.
उद्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमित्ताने कडेगाव शहरातील 185 वर्षाची परंपरा असलेल्या श्री राम मंदिर येथे. सकाळी 7 वाजता श्री राम व विठ्ठल देव यास महा अभिषेक व पूजा, सकाळी 8 ते 9.30 या वेळेत गावातील इच्छुक महिलांच्या वतीने श्री राम रक्षा पठण व आवर्तन होणार आहे, त्यानंतर 9.30 ते 11.00 कडेगाव शहरातील नामवंत श्री गोविंद गिरी भजनी मंडळ यांची भजन सेवा होईल. त्यानंतर 11.00 ते 12.30 श्री क्षेत्र अयोध्या येथून होणार्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सर्वाना स्क्रीन द्वारे ऑनलाईन दाखविण्यात येणार असून दुपारी 12.30 नंतर 1992 साली अयोध्या येथे प्रत्यक्ष जावून कार सेवा करून आलेले कडेगाव शहरातील श्री राम कार सेवक यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रभू श्री राम यांची उपस्थित मान्यवर नागरिक यांच्या हस्ते महाआरती संपन्न होवून त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात येईल. सायंकाळी 4 वाजता भव्य दिव्य शोभायात्रा सुरू होणार असून शहरातील प्रमुख मार्गावरून हजारो राम भक्त यांच्या उपस्थितीत व खास ढोल पथक, डॉल्बी साऊंड सिस्टीम,नयनरम्य फटाके रोषणाई, 15 फुट उंच जिवंत हनुमान यासह खास मेघडंबरी रथ मधून प्रभू श्री राम यांची नगर प्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर सर्व उपस्थित राम भक्त यांना महाप्रसाद लाभ दिला जाणार असून या कार्यक्रमास सर्वश्री आमदार डॉ विश्वजित कदम, युवानेते शरद भाऊ लाड व माननीय संग्रामसिंह देशमुख भाऊ आपल्या हजारो कार्यकर्ते यांच्यासह उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सकल हिंदू समाजाच्या वतीने संयोजक यांनी दिली व तालुक्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना व सर्व जाती धर्माच्या नागरिक यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती केली आहे.