उद्यमबाग येथे शिवमूर्तीची भव्य मिरवणूक
बेळगाव : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’च्या गगनभेदी घोषणांच्या निनिदात ढोलताशांच्या गजरात व मर्दानी खेळांच्या जोशात उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतीतील श्री गणेश मंदिर देवस्थानसमोर स्थापन होणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. तत्पूर्वी खानापूर रोड बेम्को येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी पाहुणे म्हणून श्री राम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडूसकर, सामाजिक कार्यकर्ते उमेश कुऱ्याळकर, शिवाजी पट्टण, प्लॅनेट हायड्रोलिकचे संचालक भूषण मंडोळकर, अश्विन मॅन्सन इंजिनिअरिंगचे संचालक अश्विन मन्नोळकर आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्तींचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवकालीन मर्दानी खेळाचा लाठीमेळा, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे अशी प्रात्यक्षिके सादर करण्यात येत होती. सुळेभावी येथील झांजपथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. सदर मिरवणूक मुख्य रोडमार्गे उद्यमबाग येथील विविध मार्गांवरून निघून श्री गणेश मंदिर देवस्थानसमोरील स्मारक येथे पोहचली. मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर आणि छत्रपतींच्या जयघोषाने उत्साहाचे वातावरण होते. परिसरातील औद्योगिक वसाहतीतील मालक, कर्मचारी व शिवभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी सुवासिनींनी मूर्तीचे आरती ओवाळून स्वागत करण्यात येत होते.
आज प्रतिष्ठापना - महाप्रसादाचे आयोजन
मंगळवारी सकाळी ठीक 9 वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीची स्थापना विधिवत पूजा अर्चा करून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर, उमेश कुऱ्याळकर, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अनगोळ विभाग प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आसपासच्या परिसरातील शिवभक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गणेश मंदिर देवस्थान व औद्योगिक मालक व कामगार बंधू शिवप्रेमी संघटना यांच्यावतीने करण्यात आले आहे.