For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुनरुज्जीवित ‘नालंदा’चे भव्य उद्घाटन

06:50 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
पुनरुज्जीवित ‘नालंदा’चे भव्य उद्घाटन
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कार्यक्रम, मुख्यमंत्री नितीशकुमार यांची उपस्थिती

Advertisement

वृत्तसंस्था / राजगीर

बाराव्या शतकाच्या शेवटी बख्तियार खिलजी या क्रूर आक्रमकाने उद्ध्वस्त केलेल्या आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पाडलेल्या इतिहासप्रसिद्ध नालंदा विश्वविद्यालयाच्या पुनरुज्जीवित परिसराचे भव्य आणि शानदार उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील राजगीर येथे करण्यात आले आहे. बुधवारच्या या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार मान्यवरांसह उपस्थित होते.

Advertisement

‘आगीच्या ज्वाळा ग्रंथ भस्मसात करु शकतात, पण ज्ञान नष्ट करु शकत नाहीत, हे सत्य नालंदा विश्वविद्यालयाने सिद्ध केले आहे. इतिहासकाळात विश्वविख्यात असणारे नालंदा विश्वविद्यालय हे केवळ विद्यापीठ नाही, तर ती भारताची अस्मिता आहे. हे स्थान भारताच्या ज्ञानपरंपरेचा भव्य आणि अविस्मरणीय वारसा आहे. सांस्कृतिक आदानप्रदानाचे हे एक वैश्विक केंद्र होते. इतिहासकाळातील नालंदाच्या भग्नावषेशांच्या नजीकच या विश्वविद्यालयाचे हे साकारलेले पुनरुज्जीवित स्वरुप भारताच्या क्षमतेचा परिचय जगाला करुन देईल.’ असे भावपूर्ण, आत्मविश्वासपूर्ण आणि यथार्थ उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिसराचे उद्घाटन करताना काढले. हा पुनरुज्जीवन प्रकल्प बिहार सरकारने 1 हजार 343 कोटी रुपयांच्या साहाय्याने 12 वर्षांमध्ये पूर्ण केलेला आहे.

हे माझे भाग्य...

‘माझ्या तिसऱ्या कार्यकालाच्या प्रथम 10 दिवसांमध्येच या विश्वविद्यालयाला भेट देण्याची संधी मला मिळाली, हे माझे थोर भाग्य आहे. तसेच भारताच्या प्रगतीसाठीही हा शुभसंकेत आहे असे मी मानतो,’ असेही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. उद्घाटनानंतर त्यांनी पुनरुज्जीवित परिसराची पाहणी केली. तसेच ऐतिहासिक नालंदा विश्वविद्यालयाच्या भग्नावशेषांचीही पाहणी केली.

संस्कृतींना जोडणारा सेतू

नालंदा विश्वविद्यालय हा भारताला शेजारच्या आणि दूरच्या संस्कृतींना आणि प्रदेशांना जोडणारा एक सेतू होता. हे विद्यापीठ ही भारताची ओळख होती. या विद्यापीठाचे पुनरुज्जीवन होणे हे भारताची संस्कृती आणि भारताचा समाज यांच्यासाठी विशेषत्वाने अभिमानाचे आहे. भारताचे ज्ञान आणि संस्कृती यांचा जगभर प्रसार करण्यात हे पुनरुज्जीवित विद्यापीठ अग्रस्थानी राहील. भारताचा सन्मान वाढवेल, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले.

अनेक देशांचा सहभाग

पुनरुज्जीवित नालंदा विश्वविद्यालयाचा परिसर निर्माण करण्यामध्ये अनेक देशांचा हातभार लागलेला आहे. 2010 मध्ये या विश्वविद्यालयाची ‘नालंदा विश्वविद्यालय कायद्यानुसार स्थापना करण्यात आली. त्याआधी 2007 मध्ये फिलीपाईन्समध्ये झालेल्या पूर्व आशिया शिखर परिषदेत हे विश्वविद्यालय पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव संमत झालेला होता. 2012 पासून प्रस्तावाच्या क्रियान्वयनाचा प्रारंभ करण्यात आला. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्रुनेई, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाओस, मॉरीशस, म्यानमार, न्यूझीलंड, पोर्तुगाल, सिंगापूर, दक्षिण कोरिया, श्रीलंका, थायलंड आणि व्हिएतनाम हे सहकार्य करणारे देश आहेत.

अनेक देशांचे विद्यार्थी

सध्या या विद्यापीठाच्या शिक्षणकार्याला प्रारंभ झाला असून अनेक देशांचे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. त्यांच्यात अर्जेंटिना, बांगलादेश, भूतान, कंबोडिया, घाना, इंडोनेशिया, केनिया, लाओस, लायबेरिया, म्यानमार, मोझांबिक, नेपाळ, नायजेरिया, रिपब्लिक ऑफ काँगो, दक्षिण सुदान, सिएरा लोन, सर्बिया, श्रीलंका, थायलंड, तुर्केई, युगांडा, अमेरिका, व्हिएतनाम आणि झिम्बाब्वे या देशांचा समावेश आहे.

नालंदा विश्वविद्यालचा संक्षिप्त इतिहास

ड सम्राट कुमार गुप्त याने पाचव्या शतकात या विश्वविद्यालयाची स्थापना केली होती. 12 व्या शतकापर्यंत ते जगातील सर्वात मोठे विद्याकेंद्र बनले होते.

ड या विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय किर्ती महान होती. चीन, मंगोलिया, तिबेट, कोरिया आदी आशियायी देशांमधून अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत.

ड हे विश्वविद्यालय महावीरा विश्वविद्यालय या नावानेही ओळखले जात होते. येथील शिक्षणाची गुणवत्ता जगात त्याकाळी अत्यंत उच्च मानली जात असे.

ड या विश्वविद्यालयात लक्षावधी हस्तलिखित ग्रंथ, लिप्या, असंख्य भाषांचे ग्रंथ, प्राचीन हस्तलिखिते, शास्त्रग्रंथ, सामग्री, इत्यादी ज्ञानसाधनांचे प्रचंड भांडार होते.

ड बाराव्या शतकाच्या अखेरीस मुस्लीम आक्रमक बख्तियार खिलजी याने हे विद्यापीठ भस्मसात केले. त्याच्या अमानुष कृतीने हा प्रचंड ज्ञानसाठा नष्ट झाला.

ड बख्तियार खिलजी याने केवळ हे विश्वविद्यालयच नष्ट केले असे नाही, तर तेथे वास्तव्यास असणारे असंख्य विद्यार्थी आणि शिक्षक यांचे शिरकाण केले.

Advertisement
Tags :

.