बालचमूंनी बनवलेल्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतींचे थाटात उद्घाटन
वार्ताहर / किणये
दिवाळी सणाला तालुक्यात मोठ्या उत्साहात सुऊवात झाली आहे. या दिवाळी सणाचे आकर्षण म्हणजे बालचमूंनी बनवलेल्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती होय. या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतींचे सध्या सर्वत्र थाटात उद्घाटन करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल इतिहास बालचमूंना कळावा यासाठी या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती महत्त्वाच्या ठरत आहेत.
बालकांनी आपल्या शालेय पुस्तकातील माहिती घेऊन, तसेच इंटरनेट व मोबाईलद्वारे गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती पाहून गेल्या पंधरा दिवसापासून या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत.गडकिल्ले बनवण्यासाठी लागणारी माती, दगड, गोळे, सिमेंट, रंग आदी साहित्याचा उपयोग करून किल्ल्यांच्या बनवलेल्या आहेत. त्यांना सर्वत्र सध्या विविध स्तरातून प्रोत्साहन मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे स्मरण लहानपणापासूनच व्हावे यासाठी दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ल्यांच्या प्रतिकृती बांधण्यास शिकवण्याची प्रथा सुरू झाली आहे. किल्ल्यांवर आसनावर आऊढ छत्रपती शिवाजी महाराज, किल्ल्यांवर रक्षण करणारे त्यांचे मावळे आदी मूर्ती ठेवण्यात आलेले आहेत. किल्ल्यांचा सुरक्षा भाग, प्रवेशद्वार, किल्ल्यांच्या आजूबाजूला असणारी झाडेझुडपे विहिरी दाखविण्यात आलेली आहेत.
सिंधुदुर्ग, शिवनेरी, प्रतापगड, राजहंसगड, रायगड, सज्जनगड, तोरणागड आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती बालकांनी साकारलेल्या आहेत. याचे अगदी जल्लोषात सध्या उद्घाटन करण्यात येत असून त्याचे प्रदर्शन करण्यात आले आहे. गावातील सर्व नागरिक व शिवप्रेमी येऊन बालकांनी बनवलेल्या या किल्ल्याच्या प्रतिकृती पाहताना दिसत आहेत.