आशा कर्मचारी संपावर! प्रलंबित मागण्यांबाबत आशा कर्मचाऱ्यांचा जि.प.वर भव्य मोर्चा
सीईओ संतोष पाटील यांना दिले निवेदन
कोल्हापूर प्रतिनिधी
सलग 23 दिवसाचा संप केल्यानंतर आशा कर्मचाऱ्यांना 7 हजार व गटप्रर्वतकांना 10 हजार मानधन वाढीची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली होती. तसेच दिवाळी भेट 2 हजार रूपये देण्याचे आश्वासने संघटनेला दिले होते. पण अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कृती समितीच्या निर्णयानुसार शनिवारपासून आशा कर्मचाऱ्यांनी पुन्हा बेमुदत संप करण्याचा निणर्य घेतला आहे. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन त्वरीत अद्यादेश काढावा, अन्यथा राज्यव्यापी आक्रमक आंदोलन केले जाईल असा इशारा आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आला. आशा कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढून जि.प.चे सीईओ संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ग्रामस्तरावरती सामान्य जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक काम करत आहेत. शासनाच्या विविध योजना अंतर्गत राज्यस्तरावरती आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. अनेक योजनेमध्ये आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांना कामावर आधारीत मोबदला मंजूर आहे. शासनाने दिलेल्या सुचनांनुसार सुमारे 72 हेड वर आशा स्वयंसेविका यांना कामे करावी लागत आहेत. त्यानुसारच त्यांना मानधन देय आहे. त्यांना विनामोबदला कोणतेही काम देणेत येऊ नये अशी शासनस्तरावरून सुचना आहे. तरीही त्यांना जादा काम दिले जात आहे. त्यांना ऑनलाईन कामाची सक्ती केली जात आहे. या कामांच्या तुलनेत त्यांना मोबदला मिळत नाही. त्यामुळे अतिरिक्त कामे देऊ नयेत अशी संघटनेची मागणी आहे. तसेच गटप्रवर्तकांचे समायोजन करा, आशा व गटप्रवर्तक यांच्यावरील ऑनलाइन कामाची सक्ती पूर्णपणे बंद करा, आशा व गटप्रवर्तक यांना दिवाळी बोनस द्या, मानधनात केंद्र सरकारने वाढ करावी यासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. काँम्रेड चंद्रकांत यादव आणि आशा कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा उज्वला पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.