गोहत्या निषेधार्थ महाडमध्ये सकल हिंदूंचा भव्य मोर्चा
पोलीस बंदोबस्त तैनात
रायगड दि.२२जून / प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मंगळवार दिनांक १८ जून रोजी ईसाने कांबळे येथे झालेल्या गोहत्येच्या निषेधार्थ आज (शनिवार) महाड शहरामध्ये सकल हिंदू समाज बांधवांचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता. चवदार तळे, तांबट आळी , हुतात्मा कमलाकर दांडेकर चौक, बाजारपेठ, महात्मा गांधी मार्गाने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांना निवेदन देण्यात आले. शहरात शांतता पूर्ण वातावरण असताना देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महाड तालुक्यातील इसाने कांबळे या गावांमध्ये मंगळवार दिनांक १८ जून रोजी हिंदू समाजाला अत्यंत श्रद्धेय आणि अध्यात्मिक दृष्ट्या वंदनीय असलेल्या गोवंशाची हत्या करण्यात आली. या घटनेचे संपूर्ण रायगड सह राज्यामध्ये तीव्र पडसाद उमटले,इसाने कांबळे गावामध्ये गोवंश हत्या करण्यात येत असल्याची माहिती पोलस प्रशासनाला असताना देखील गोहत्या रोखण्यात अपयश आले. ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी हिंदू समाजाचे कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी गोहत्या रोखण्याच्या हेतूने इसाने कांबळे येथे गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अपुरे पोलीस दल असल्याने पोलिसांवर हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यामध्ये हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्यात आली,
अशाच स्वरूपाची घटना महाड तालुक्यातील राजेवाडी, गावामध्ये घडलेल्या असताना हिंदू तरुणांना, पोलिसांना जिहादी जमावाने मारहाण केली होती. अशा स्वरूपाच्या घटना रायगड जिल्ह्यासह महाड तालुक्यात वारंवार घडत असताना पोलिसांकडून योग्य कारवाई तसेच गोहत्या रोखण्यात अपयश येत असल्याचा निषेध यावेळी करण्यात आला.
शासनाला देण्यात आलेल्या निवेदनामध्ये गोहत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसह विविध मागण्या करण्यात आल्या असुन यापुढे अशा सामाजिक ,धार्मिक, सांस्कृतिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, गोहत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.