For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सोमनाथ स्वाभिमान पर्वा’चा भव्य प्रारंभ

07:05 AM Jan 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘सोमनाथ स्वाभिमान पर्वा’चा भव्य प्रारंभ
Advertisement

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोहळा, एक वर्ष उत्सव 

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ या सोहळ्याचा भव्य आणि शानदार शुभारंभ करण्यात आला आहे. हे पर्व एक वर्षभर देशभरात साजरे करण्यात येणार आहे. परकीय आक्रमकांनी नष्ट केलेल्या आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुनर्स्थापित करण्यात आलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराशी संबंधित हा सोहळा आहे. 75 वर्षांपूर्वी या पुर्नस्थापित मंदिरात भगवान शंकरांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. या अमृतमहोत्सवानिमित्त हा सोहळा आहे.

Advertisement

आपला धर्म आणि आपली संस्कृती यांच्यावर भारतीयांच्या असलेल्या अजोड आणि अमिट निष्ठेचे प्रतीक म्हणून हे सोमनाथ मंदिर परिचित आहे. परकीय आक्रमकांनी ते नष्ट करुन भारतीयांच्या भावनांवर आघात करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, भारतीयांनी या मंदिराची पुनर्स्थापना करुन आपली दुर्दम्य निष्ठा सिद्ध केली आहे. हे मंदिर इतिहासकाळात अत्यंत आव्हानात्मक स्थितीतही भारतीयांनी अत्यंत संयतपणे पण निर्धाराने केलेल्या परकीय आक्रमकांच्या प्रतिकाराचे मूर्त स्वरुप आहे, अशी भलावण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 2001 मध्ये या प्राणप्रतिष्ठेचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला होता.

जुनी छायाचित्रे प्रसिद्ध

या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2001 च्या कार्यक्रमाची काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. प्राणप्रतिष्ठेचा सुवर्णमहोत्सव त्यावर्षी साजरा करण्यात आला होता. त्यावेळी भारतात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार होते. आज या प्राणप्रतिष्ठा प्रसंगाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील याच आघाडीचे सरकार आहे, हा विलक्षण योगायोग आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भारताच्या इतिहासातील ही एक अभिमानास्पद घटना मानली जाते.

एक सहस्र वर्षांचा इतिहास

इसवी सत 1026 मध्ये मोहम्मद गझनी या परकीय आक्रमकाने सोमनाथवर हल्ला करुन या मंदिराची विटंबना केली होती. या घटनेला आज यावर्षी 1 सहस्र वर्षे पूर्ण होत आहेत. 1 हजार वर्षांमध्ये अनेकवेळा परकीय आक्रमकांनी या मंदिराची नासधूस केली. तथापि, प्रत्येक वेळी भारतीय लोकांनी हे मंदिर पुन्हा स्थापित केले. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेऊन या मंदिराची पुनर्स्थापना केली. 1951 मध्ये हे पुनर्स्थापनेचे कार्य पूर्ण होऊन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या मंदिरात भगवान श्रीशंकरांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती, हा इतिहास आहे.

मंदिरात अनेक कार्यक्रम

हिंदूंसाठी अत्यंत पवित्र 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिरात प्राणप्रतिष्ठा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त या सोमनाथ मंदिरात अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम 8 जानेवारी ते 11 जानेवारी या कालखंडात होणार आहेत. अनुष्ठान, भजन, पूजन अशा अनेक कार्यक्रमांना स्थान दिले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

देशभरात पर्व साजरे होणार

सोमनाथ प्राणप्रतिष्ठा अमृत महोत्सव हे पर्व केवळ गुजरातमध्येच नव्हे, तर साऱ्या देशात साजरे केले जाणार आहे. या निमित्त देशात विविध स्थानी आणि भगवान शंकरांच्या मंदिरांमध्ये, तसेच बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानी अनेक धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. धर्म आणि अध्यात्म क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. काही राजकीय पक्षही या कार्यक्रमात सहभागी होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतीयांच्या स्वाभिमानाचे हे प्रतीक

  • सोमनाथ मंदिर हे भारतीयांच्या धर्मनिष्ठेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक
  • 1 हजार वर्षांपूर्वी परकीय आक्रमकांकडून नष्ट, भारतीयांकडून पुनर्स्थापना
  • 1951 मध्ये झाली होती प्राणप्रतिष्ठा, 2026 हे अमृतमहोत्सवी संवत्सर
Advertisement
Tags :

.