For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हलशी-हलशीवाडी महालक्ष्मी यात्रेचा भव्य शुभारंभ

12:16 PM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
हलशी हलशीवाडी महालक्ष्मी यात्रेचा भव्य शुभारंभ
Advertisement

अक्षतारोपण समारंभ भक्तीभावात साजरा : सोहळ्यासाठी भाविकांचा लोटला जनसागर

Advertisement

वार्ताहर/हलशी

हलशी-हलशीवाडी (ता. खानापूर) येथे कदंबकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री ग्रामदेवता महालक्ष्मीदेवी यात्रोत्सवाचा बुधवारी अत्यंत भक्तिभावाने आनंदमय वातावरणात शुभारंभ झाला. पहाटे 6.23 वाजता सूर्योदयाच्या शुभमुहूर्तावर हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. यात्रेतील प्रमुख धार्मिक विधी असलेला अक्षतारोपण सोहळा विधीवत पार पडला. वेदमंत्रांच्या निनादात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्dयामुळे संपूर्ण परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. अक्षतारोपणानंतर देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्यांचा गजर, भंडाऱ्याची उधळण आणि ‘जय देवी महालक्ष्मी’...च्या जयघोषात हजारो भाविकांनी उत्साहात सहभाग घेतला. ही मिरवणूक संपूर्ण हलशी-हलशीवाडी गावातून फिरत भक्ती आणि परंपरेचे दर्शन घडवत होती. घरोघरी ओटी भरण्याचा कार्यक्रम मिरवणुकीदरम्यान दोन्ही गावांतील बनकरी, हक्कदार, वतनदार, पंचमंडळी तसेच सर्वसामान्य भाविकांनी दिवसभर देवीला घरोघरी आमंत्रित करून साजरा केला.

Advertisement

देवीचा मुक्काम ऐतिहासिक मंदिर प्रांगणात

आजचा देवीचा मुक्काम कदंबकालीन ऐतिहासिक श्री लक्ष्मी-नृसिंह व भुवराह मंदिराच्या प्रांगणात होणार असून, या ठिकाणी रात्री विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आजच्या रथोत्सवासाठी भाविकांची उत्सुकता शिगेला

आज गुरुवार दि. 9 रोजी दुपारी 2 वाजता देवी रथामध्ये विराजमान होऊन गदगेकडे प्रयाण करणार आहे. त्यानंतर विधीवत प्रतिष्ठापना होऊन देवीला मान देण्यात येईल आणि यात्रोत्सवाची पुढील पर्वणी सुरू होणार आहे. या भव्य यात्रोत्सवासाठी खानापूर तालुका, नंदगड परिसर, हल्याळ तालुका तसेच महाराष्ट्र व गोवा राज्यांतून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. यावेळी राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनीही हजेरी लावून सोहळ्याची शोभा वाढवली.

Advertisement
Tags :

.