बेळगावमध्ये साकारणार भव्य गांधी स्मारक
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची घोषणा : सुमारे 100 कोटी रु. खर्च करणार : विविध पुरस्कारांचे वितरण
बेळगावमध्ये सुमारे 100 कोटी रुपये खर्चून भव्य गांधीजी स्मारक निर्माण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली आहे. महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे 1924 साली झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर : वार्ता आणि जनसंपर्क खात्यातर्फे शुक्रवारी बेंगळूरच्या कर्नाटक गांधी स्मारक निधी येथे आयोजित महात्मा गांधी जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी वुडे पी. कृष्ण यांना गांधी सेवा पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, बेळगावमध्ये गांधीजी सहभागी झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्मरण म्हणून 100 कोटी रु. खर्चून भव्य स्मारक निर्माण निर्माण केले जाईल.
स्मारक निर्माण करण्याबाबत पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात अनुदान घोषित केले जाईल. गांधीजींनी भेट दिलेल्या कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांत स्मारक स्तंभ निर्माण केले जातील. त्याचे काम वर्षभरात पूर्ण केले जाईल. याकरिता आर्थिक साहाय्य देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जगातील विविध देशांमध्ये गांधीजींचे पुतळे उभारण्यात आले आहेत. विद्यापीठांवर त्यांच्या जीवनावर आधारित चर्चासत्रे आयोजित केली जातात. जगभरातील नेते गांधींजींना आपला आदर्श मानतात. मात्र, केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेतून गांधीजींचे नाव का वगळले, हेच अद्याप स्पष्ट झालेले नाही. योजनेला गांधीजींचे नाव असते तर कोणती समस्या निर्माण झाली असती? देशावर राज्य करणाऱ्या नेत्यांना गांधीजींचे नाव वगळावे असे का वाटले? अशी खंत मुख्यमंत्री शिवकुमार यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमप्रसंगी मंजुनाथ चांद यांच्या ‘महात्मन मगळू’ आणि रमेश बिळीकेरे यांच्या ‘मरेयलागद माणिक्य टी. एस. सुब्बण्णा’ या कृतींना जयलक्ष्मी श्रीनिवासय्या पुरस्कार प्रदान करण्यात आला.म्हैसूरमधील कडकोळ येथील शेषद्रीपुरम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एनएसएस अधिकारी आर. राघवेंद्र आणि बेळगाव जिल्ह्यातील कुडची येथील बी. शंकरानंद महाविद्यालयाच्या एनएसएस अधिकारी सुरेखा अशोक बेळगली यांना प्रा. जी. बी. शिवराजू अत्युत्तम एनएसएस पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय उत्तम एनएसएस स्वयंसेवक पुरस्कार तुमकूरमधील जी. ए. सिद्धेश, मस्की येथील जे. नागराज, मंड्या येथील चैत्रा सी. आणि रायचूरमधील जे. एस. सुषमा यांना प्रदान करण्यात आला.