बेळगुंदी येथे आज भव्य शेतकरी मेळावा
शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा
किणये:
स्वाभिमानी शेतकरी संघटना बेळगाव तालुका यांच्यावतीने बेळगुंदी येथे रविवार दि. 3 रोजी सकाळी 9:30 वाजता भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ग्रामस्थ कमिटीचे अध्यक्ष किरण मोटणकर हे राहणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती या मेळाव्यास राहणार आहे. सध्या बेळगाव तालुक्यात काजू व आंब्याच्या उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. तसेच काही शेतकरी ऊस दराला जाहीर झालेला एफ. आर.पी. दर यापासून वंचित आहेत. पिकांना योग्य हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांना दुष्काळ निधी उपलब्ध होत नाही. अशा अनेक शेतकऱ्यांच्या समस्याबाबत या मेळाव्यात सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
बेळगाव तालुक्यातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतकरी आणि शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिकांच्या संदर्भात आणि बाजारभावाच्या संदर्भात, उत्पादनाला योग्य हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांना दुष्काळ निधी उपलब्ध व्हावा यासाठी या मेळाव्याच्या माध्यमातून आवाज उठविण्यात येणार आहे. बेळगाव व खानापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटना बेळगाव तालुका अध्यक्ष परशराम पाटील व संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.