शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी १२ एप्रिलला भव्य परिषद
“शेती वाचवा, शेतकरी वाचवा” परिषदेचे कोल्हापूर -शाहूवाडीत आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी
दक्षिण महाराष्ट्र व कोकणातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी “शेती वाचवा, शेतकरी वाचवा” ही भव्य परिषद येत्या १२ एप्रिल रोजी शाहुवाडी, जि. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध या परिषदेत तीव्र एल्गार पुकारला जाणार आहे.अशी माहिती परिषद संघटक समितीचे प्रमुख कॉ. अतुल दिघे, बी. के. आमरे व धोंडीबा कुंभार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.या परिषदेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते खासदार राजाराम सिंग असतील, तर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे भाई भारत पाटील हे स्वागताध्यक्ष असून, विविध संघटनांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये अखिल भारतीय किसान महासभेचे राष्ट्रीय सचिव पुरुषोतम शर्मा, श्रमिक शेतकरी संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष राजेंद्र बावके, सचिव उद्धव शिंदे, आदिवासी शेतकरी नेते किशोर ढमाले, तसेच एस. व्ही. जाधव यांचा समावेश आहे.परिषदेत शेतकऱ्यांसमोरील गंभीर समस्या मांडल्या जाणार आहेत. जंगली प्राण्यांचे वाढते हल्ले, शेतीचे होणारे नुकसान, अपुरी नुकसानभरपाई, बेकायदेशीर जंगलतोड व खाणकाम यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारच्या धोरणांमुळे माणूस व वन्यजीव संघर्ष तीव्र होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात येणार आहे.तसेच, महामार्ग व प्रकल्पांसाठी शेतजमिनी संपादित केल्या जात असून, अत्यल्प नुकसानभरपाई दिली जात असल्याने शेतकरी उध्वस्त होत आहे. शेतीसाठी लागणारे बियाणे, खते व औषधे महाग झाली असून, शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.केमिकल व इतर औद्योगिक प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, शेती व मत्स्यव्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.यापूर्वी काजू व आंबा उत्पादकांच्या विविध आंदोलनांनी या प्रश्नांची तीव्रता अधोरेखित केली आहे. त्यामुळे आता एकत्रित धोरण व निर्णायक लढा उभारण्याची गरज व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग व कोकण विभागातील शेतकरी, महिला-पुरुष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परिषद संघटक समितीचे प्रमुख कॉ. अतुल दिघे, बी. के. आमरे व धोंडीबा कुंभार यांनी केले.