For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेचा शानदार समारोप

07:10 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेचा शानदार समारोप
Advertisement

राष्ट्रकुल ‘बॅटन’चा अहमदाबादच्या दिशेने प्रवास सुरू, सांगता सोहळ्यात भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन

Advertisement

वृत्तसंस्था, ग्लासगो : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला असून सांगता होत असताना भारताने जगाला पुढील राष्ट्रकुल खेळांसाठी अहमदाबादमध्ये येण्याचे उत्साही निमंत्रण दिले. प्राचीन तत्त्वज्ञान, समकालीन कला आणि सांस्कृतिक भव्यतेचा सुरेख संगम असलेल्या एका सादरीकरणाद्वारे ही जबाबदारी भारताकडे सोपवण्यात आली. यासोबतच 2030 मधील या क्रीडास्पर्धेच्या शताब्दी आवृत्तीच्या दिशेने भारताचा प्रवास अधिकृतपणे सुरू झाला.

रविवारी ‘ओव्हीओ हायड्रो’ येथे झालेल्या समारोप सोहळ्यातील सर्वांत भावपूर्ण क्षण ग्लासगोने राष्ट्रकुल खेळांची बॅटन अधिकृतपणे भारताकडे सोपविली तो होता. त्यानंतर संगीत, नृत्य आणि कथाकथनाच्या माध्यमातून भारताची जिथे परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर मेळ पाहायला मिळतो, अशी ओळख जगासमोर मांडण्यात आली. राजे चार्ल्स तृतीय यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले प्रिन्स एडवर्ड (ड्यूक ऑफ एडिनबर्ग) यांनी या क्रीडास्पर्धांची सांगता झाल्याची अधिकृत घोषणा केली.

Advertisement

महिलांच्या 57 किलो वजन गटातील बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या जस्मिन लंबोरिया हिने समारोप सोहळ्यात भारताचा ध्वज फडकविला. अधिकृत हस्तांतरण प्रक्रियेची सुऊवात राष्ट्रकुल ध्वज मैदानावरून नेण्याच्या प्रतीकात्मक प्रवासाने झाली. स्कॉटिश आणि भारतीय ध्वज हाती घेतलेल्या ध्वजवाहकांच्या नेतृत्वाखालील मिरवणुकीत घडी घातलेला राष्ट्रकुल खेळांचा ध्वज खाली उतरवण्यात आला. त्यानंतर ग्लासगोच्या लॉर्ड प्रोवोस्ट जॅकलीन मॅक्लरेन यांनी तो ध्वज ‘कॉमनवेल्थ गेम्स स्कॉटलंड’च्या उपाध्यक्षा सुझान जॅक्सन, स्कॉटिश नेटबॉल खेळाडू एमिली निकोल आणि ’कॉमनवेल्थ स्पोर्ट’च्या प्रतिनिधींकडे सोपवला.

या क्रार्यक्रमात आकर्षक डिजिटल दृश्यांच्या पार्श्वभूमीवर शेकडो नर्तकांनी भारताच्या विविधतेचे विलोभनीय चित्र उभे केले, तर संगीतकार शंकर महादेवन यांच्या हृदयस्पर्शी संगीताने पाश्चात्य ऑर्केस्ट्राची भव्यता आणि भारतीय संगीत परंपरा यांचा सुरेख संगम साधला. विविध भाषा, रीतिरिवाज आणि कलात्मक परंपरांच्या माध्यमातून जगाचे स्वागत करणाऱ्या एका समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवणे हा या सादरीकरणाचा उद्देश होता. एका विशेष लघुपटाद्वारे आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना अहमदाबाद शहराची ओळख करून देण्यात आली.

गुजराती पार्श्वगायिका भूमी त्रिवेदी हिने यावेळी यजमान गुजरातला विशेष मानवंदना दिली. स्कॉटिश संगीत, कविता आणि नृत्याचा समावेश असलेल्या ग्लासगोच्या निरोप समारंभानंतर हा भारतीय कार्यक्रम सादर झाला. स्कॉटलंडची व्हीलचेअर रेसर मेलानी वूड्स हिने ‘डेव्हिड डिक्सन पुरस्कार’ पटकावला. हा पुरस्कार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूला दिला जातो.

‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश, वंदे मातरमच्या 150 वर्षांचेही स्मरण

अध्यक्ष डॉ. डोनाल्ड ऊकारे, दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी. टी. उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या प्रसंगी यजमानपदाची जबाबदारी स्कॉटलंडकडून भारताकडे अधिकृतपणे सोपवण्यात आली. त्यानंतर भारताची सांस्कृतिक आणि सभ्यतेची मूल्ये मांडणारे सादरीकरण तीन टप्प्यांत पार पडले. या सादरीकरणाचा मुख्य संदेश ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा होता. पहिल्या टप्प्यात ‘वंदे मातरम्’च्या 150 व्या वर्धापनदिनाचेही स्मरण करण्यात आले, ज्यामध्ये अभिनेत्री मानुषी चिल्लरच्या नेतृत्वाखालील नृत्याचा समावेश होता.

शंकर महादेवनने केला समारोप

दुसऱ्या टप्प्यात ‘सांस्कृतिक जुगलबंदी’ या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले भारतीय सतारवादक ऋषभ शर्मा आणि प्रसिद्ध स्कॉटिश संगीतकार रॉस एन्सली यांची जोडी एकत्र आली. शर्मा यांचे सतारवादन आणि एन्सली यांचे स्कॉटिश ‘पाईप्सवादन व ‘व्हिसल्स’ लोकांना रिझवून गेले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शंकर महादेवनने आपली मुले सिद्धार्थ आणि शिवम महादेवन यांच्यासह मंचावर पुनरागमन केले आणि भारताची अत्यंत लोकप्रिय गाणी सादर केली. यामध्ये ‘सुनो गौर से दुनिया वालों’, ‘भाग मिल्खा’, ‘ए वतन वतन’ आणि ‘लहरा दो’ यांसारख्या गाण्यांचा समावेश होता.

Advertisement
Tags :

.