हिंदू नववर्षाचा सर्वत्र शानदार शुभारंभ
घरोघरी, मंदिरांसह सार्वजनिक ठिकाणी गुढीरोहण : पारंपरिक, सांस्कृतिक आविष्कारासह प्रभातफेऱ्या
पणजी : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढी पाडवा उत्सव गोव्यात सर्वत्र उत्साहाने, पारंपरिक रितीरिवाजाने साजरा करण्यात आला. घरोघरी, मंदिरांमधून, तसेच सार्वजनिक ठिकाणी जमून लोकांनी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. राजधानी पणजीसह म्हापसा, फोंडा, मडगाव, वास्को इत्यादी विविध शहरांतून तसेच प्रमुख गावांतून पारंपरिक वेशभूषा करून प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. काहीजणांनी वाहने घेऊन तर काहींनी चालत या फेऱ्या काढून नवीन वर्षानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
गुढी पाडवा हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी एक असल्यामुळे त्याचे निमित्त साधून अनेकांनी नवीन वाहनांची खरेदी केली, तर अनेकांनी नवीन घरात, फ्लॅटमध्ये प्रवेश केला. काही जणांनी पाडव्याचे औचित्य साधून दागिन्यांची खरेदी केली. नवीन कार्याचा अनेक ठिकाणी शुभारंभ करण्यात आला. काहीजणांनी नवीन घरासाठी पायाभरणी केली. दुकाने, आस्थापने यातूनही पूजा व इतर धार्मिक कार्ये करण्यात आली. अनेक मंदिरांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी श्रीसत्यनारायण पूजा बांधण्यात आली.
पाडव्याच्या मुहुर्तावर विविध मंदिरात अनेक प्रकारचे धार्मिक विधी झाले. त्याशिवाय भजन, कीर्तन, प्रवचन तसेच व्याख्याने यासारखे उपक्रमही राबवण्यात आले. अनेक मंदिरांतून विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच सत्यनारायण पूजा, महाप्रसाद, आरती आदी कार्यक्रम झाले. काही ठिकाणी नाटके, विविध स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.