For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महायुतीच ठरलं, दोन्ही जागा शिंदे गटाकडेच? शिवसेनेच्या सभेनंतर भाजपच्या मेळाव्यातूनही

12:47 PM Feb 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
महायुतीच ठरलं  दोन्ही जागा शिंदे गटाकडेच  शिवसेनेच्या सभेनंतर भाजपच्या मेळाव्यातूनही
ShivSena
Advertisement

लोकसभा उमेदवारीचे संकेत; खासदार प्रा. मंडलिक, मानेंकडून प्रचार दौरे सुरु; मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मायक्रोप्लॅनिंग

धीरज बरगे कोल्हापूर

गांधी मैदानातील शिवसेनेच्या जाहीर सभेनंतर शनिवारी महासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यातूनही जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिंदे गटाकडेच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. त्यामुळे कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. वरीष्ठ पातळीवरुनही तसे संकेत मिळाल्याने शिंदे गटाचे खासदार प्रा. संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघात प्रचार दौरे सुरु केले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात महायुतीचे मल्ल उतरले असून त्यांनी शड्डू ठोकण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची वातावरण निर्मिती सुरु झाली आहे. शिवसनेचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन प्रथमच कोल्हापुरात झाले. यामधून शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच फोडला. शिवसेनेचे अधिवेशन होऊन आठवडाभरातच भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले. त्यांनीही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत उमेदवार महायुतीमधील कोणत्याही घटक पक्षाचा असला तरी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन केले. प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनीही त्यांच्या भाषणा दरम्यान प्रथम घोषणाबाजी केली, पण पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दोन्ही जागा शिंदे गटाकडे गेल्याने उत्साह कमी झाल्याचे वक्तव्य करत लोकसभेच्या दोन्ही जागा शिंदे गटाकडेच राहणार असल्याचे संकेत दिले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील दोन्ही खासदारांबाबत मतदारांमध्ये नाराजी असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. यामध्येच जिल्ह्यातील एक जागा भाजपला मिळण्याची मागणीही भाजप नेत्यांमधून होत होती. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेकडेच राहण्यासाठी शिवसेनेतील नेते आग्रही आहेत. महायुतीमधील जागावाटप अद्याप जाहीर झाले नसले तरी शिवसेनेची जाहीर सभा आणि भाजपच्या मेळाव्यामधून जिल्ह्यातील दोन्ही जागा सध्यातरी शिवसेनेकडेच राहतील, असे चित्र आहे.

Advertisement

भाजपकडून प्रचाराचे मायक्रो प्लॅनिंग
कोल्हापूर लोकसभेच्या आखाड्यात भाजपचा उमेदवार नसला तरी भाजपकडून पंतप्रधान मोदींचे स्वप्न ‘अबकी बार.., चारसो पार’ पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे. विधानसभा, जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती, महानगरपालिका क्षेत्रात प्रभागनिहाय प्रचार, केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे, मतदारसंघात संपर्क, वरीष्ठ नेत्यांकडुन पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणे असे मायक्रो प्लॅनिंग भाजपकडून केले असून त्यानुसार जिल्ह्यातील नेते, पदाधिकाऱ्यांकडून कामही सुरु झाले आहे.

खासदार प्रा. मंडलिक, मानेंकडून प्रचार दौरे सुरु
उमेदवारीबाबत संकेत मिळाल्यानंतर खासदार प्रा. संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघात प्रचार दौरे सुरु केले आहेत. मतदारसंघातील विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका त्यांच्याकडून सुरु आहे. मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यासाठी खासदारांसह त्यांच्या प्रचार यंत्रणेने पायाला भिंगली बांधल्याचे चित्र आहे.

महायुतीसमोर महाविकास आघाडीचे आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर जिल्ह्यात महायुती अधिक बळकट झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पालकमंत्री हसन मुश्रीफही महायुतीमध्ये गेल्याने आमदार सतेज पाटील यांची जिल्ह्यातील ताकद थोडीफार कमी झाली आहे. तरीही आमदार सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यात काँग्रेसचे पाच आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था पातळीवरही काँग्रेस बळकट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश मातब्बर नेते महायुतीमध्ये असले तरी लोकसभा निवडणुकीत महायुतीसमोर महाविकास आघाडीचे कडवे आव्हान असणार आहे.

Advertisement
Tags :

.