ग्रा. पं. च्या कचरावाहू वाहनांवर 239 महिला चालकांना परवाना
अनेक वाहने ग्रा. पं. समोर पडून : महिला चालक मिळत नसल्याचा परिणाम
बेळगाव : ग्रा. पं. च्या व्याप्तीमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जि. पं. कडून योजना आखण्यात आली आहे. यासाठी ग्रा. पं. ना कचरावाहू वाहने दिली आहेत. मात्र या वाहनांवर महिला चालक उपलब्ध होत नसल्याने अनेक ग्रा. पं. समोर कचरावाहू वाहने थांबून आहेत. असे असले तरी जिल्ह्यामध्ये 500 ग्रा. पं. मध्ये 239 महिला चालकांना प्रशिक्षण देऊन चालक परवाना देण्यात आला आहे. ग्रा. पं. व्याप्तीमधील कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी प्रत्येक ग्रा. पं. ला कचरावाहू वाहन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या वाहनांवर महिला चालक नेमणूक करण्याच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. जि. पं. च्या महिला सबलीकरण आणि जीवनोपाय विभागातर्फे 500 ग्रा. पं. च्या व्याप्तीमध्ये प्रत्येक वाहनावर महिला चालक नेमण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 500 ग्रा. पं. साठी 487 महिला चालकांची नोंद घेण्यात आली होती. मात्र यामधील 259 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामधील 239 महिलांना प्रशिक्षण देऊन वाहन चालविण्याचा परवाना देण्यात आला आहे. तर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 142 महिला प्रशिक्षणार्थींकडून परवान्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. असे असले तरी अनेक ग्रामपंचायतीच्या व्याप्तीमध्ये कचरा वाहतूक करणारी वाहने अद्याप वापराविना पडून आहेत. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी ग्रा. पं. कडून कोणतीच प्रभावी कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागामध्येही कचऱ्याचे ढीग जागोजागी साचत चालले आहेत. गावच्या प्रवेशद्वारासह ओढ्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. याकडे ग्रा. पं. ने साफ दुर्लक्ष केले आहे. सरकारकडून कचरावाहू वाहनासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून वाहने उपलब्ध करून देण्यात येत असली तरी नियोजनाअभावी सरकारचा उद्देश कागदावरच रहात आहे.