Grampanchayat Election 2025 साठी आतापासूनच धुराळा, गटातटांकडून जोडण्या सुरु
यामुळे गटा-तटाचे राजकारण सुरु होऊन रान तापू लागले आहे
कोल्हापूर : जिल्ह्यातील 456 ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2026 मध्ये संपणार आहे. त्यांच्या निवडणुकीसाठी अजून सात महिन्यांचा कालावधी आहे. पण, कारभाऱ्यांनी वर्चस्व राखण्यासाठी आताच जोडण्या सुरु केल्या. यामुळे गटा-तटाचे राजकारण सुरु होऊन रान तापू लागले आहे.
गेली चार ते पाच वर्षे राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, पंचयात समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकांकडे लागले होते. न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे.
निवडणूक विभागाकडून ईव्हीएम मशीनच्या पडताळणीचे काम सुरु आहे. तसेच प्रारुप प्रभाग रचना झाली असून त्यावर हरकती आल्या आहेत. यावर आता विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीनंतर काही महिन्यातच जिल्ह्यातील 456 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
या ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2026 मध्ये संपत आहे. मुदत संपायला अजून सात महिन्यांचा अवधी आहे. मात्र गाव कारभाऱ्यांनी ग्रामपंचायतीवर आपलाच झेंडा फडकवण्यासाठी आतापासून तयारी सुरु केली आहे. गटातटाच् या जोडण्या लावल्या जात आहेत. यामुळे 456 गावांमध्ये रण तापू लागले आहे. एकंदरीत धुरळा उडायला सुरवात झाली आहे.