For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅन्टोन्मेंटच्या कचरावाहू वाहनांना बसविणार जीपीएस यंत्रणा

11:17 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅन्टोन्मेंटच्या कचरावाहू वाहनांना बसविणार जीपीएस यंत्रणा
Advertisement

कचरा उचल केल्याच्या नोंदीसाठी घरमालकांची स्वाक्षरी घेणार

Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये कचरा उचल करण्याबाबत अनेक तक्रारी केल्या जात होत्या. प्रत्येक बंगलोपर्यंत कचरा उचल करणारे वाहन पोहोचत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्यानंतर आता कॅन्टोन्मेंट बोर्डने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन पावले उचलली आहेत. प्रत्येक कचरावाहू वाहनाला जीपीएस बसविण्यासोबतच यापुढे प्रत्येक घरमालक व व्यावसायिकाकडून कचरा उचलला गेल्याबद्दलची स्वाक्षरी घेण्यात येणार आहे. घरोघरी कचरा उचल करण्यासाठी कॅन्टोन्मेंटकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. दोन कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. यापूर्वी कचरा उचल करताना नागरिकांकडून अनेक तक्रारी येत असल्याचे नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर यांनी स्पष्ट केले. अनेक बंगल्यांपर्यंत कचरा उचल वाहन जात नसल्याची तक्रार त्यांनी केली.

यावर स्पष्टीकरण देताना सीईओ राजीव कुमार म्हणाले, कचरा उचल सकाळी 8 वाजल्यापासून केला जात होता. परंतु, नागरिक लवकर कचरा देत नसल्याने वाहन पुढे निघून जात होते. तसेच काही ठिकाणी नागरिक उठण्यापूर्वीच वाहन पुढे जात होते. त्यामुळे नागरिकांनीही आपल्या वेळेतच कचरा दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तसेच कचरा उचलणारी वाहने कॅन्टोन्मेंट कार्यालयाच्या परिसरातच ठेवली जात असून सकाळी 9 वाजल्यापासून कचरा उचल करण्यास यापुढे सुरुवात केली जाणार आहे. कचरा उचल करण्यासाठी एकूण तीन वाहने ठेवण्यात आली आहेत. ही वाहने नेमकी कोणत्या विभागात फिरतात, हे पाहण्यासाठी जीपीएस लावले जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक बंगल्यातील कचरा जमा केला जातो की नाही? हे पाहण्यासाठी  प्रत्येक घरमालक व व्यावसायिकांकडून रजिस्टरवर स्वाक्षरी करून घेतली जाणार असल्याचे सीईओंनी स्पष्ट केले. त्याचबरोबर घरोघरी कचरा उचल होत असल्याने सार्वजनिक कचराकुंड्या बंद करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.