For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसची ‘गोवा राखण’ नव्हे, तर ‘लाचार काँग्रेस बचाव’ यात्रा; सिद्धेश नाईक यांची टीका

12:09 PM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसची ‘गोवा राखण’ नव्हे  तर ‘लाचार काँग्रेस बचाव’ यात्रा  सिद्धेश नाईक यांची टीका
Advertisement

पणजी : काँग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या ‘गोवा राखण’ यात्रेवर भाजपचे प्रवक्ते सिद्धेश श्रीपाद नाईक यांनी जोरदार टीका केली आहे. ही यात्रा गोवा किंवा गोवेकरांच्या हितासाठी नसून काँग्रेसचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

Advertisement

काँग्रेसने २२ सप्टेंबरपासून ‘गोवा राखण’ यात्रा सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नाईक यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून काँग्रेसच्या संघटनात्मक स्थितीवर प्रश्न उपस्थित केले.

यात्रेच्या प्रारंभी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला काँग्रेसचे काही प्रमुख नेते उपस्थित नसल्याचा दावा करत नाईक यांनी पक्षातील अंतर्गत मतभेद आणि गटबाजीवर निशाणा साधला. काँग्रेसकडे गोव्याच्या विकासासाठी स्पष्ट दृष्टिकोन नसल्याचेही त्यांनी म्हटले.

Advertisement

काँग्रेस नेते केवळ पद आणि सत्तेसाठी संघर्ष करत असल्याचा आरोप करत नाईक यांनी, “काँग्रेसची ही ‘गोवा राखण’ नव्हे, तर ‘काँग्रेस बचाव’ यात्रा आहे,” अशी टीका केली. काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकीय स्वार्थाला प्राधान्य दिले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, २०२७च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात विरोधकांकडून विविध राजकीय आघाड्या आणि पर्यायांबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेसने विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका मांडली असून, पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी आघाडीच्या चर्चेसाठी काँग्रेसचे दरवाजे खुले असल्याचे म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर नाईक यांनी काँग्रेसच्या भविष्यातील निवडणूक कामगिरीवरही भाष्य करत २०२७मध्ये पक्षाला मोठ्या राजकीय आव्हानांना सामोरे जावे लागेल, असा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप-काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा धार आली आहे.

Advertisement

.