गोविंद कारजोळ चित्रदुर्गमधून निवडणुकीच्या रिंगणात
मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची पुन्हा एन्ट्री : यंदा विजय मिळविणे काँग्रेससाठी आव्हानात्मक
चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या 17 निवडणुकांमध्ये 11 वेळा विजयी मिळविलेल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने 2009 नंतर पुन्हा एन्ट्री मारली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार ए. नारायणस्वामी यांनी काँग्रेसचे उमेदवार बी. एन. चंद्रप्पा यांना पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विजय मिळविणे काँग्रेससाठी आव्हानात्मक आहे. यंदा भाजपने विजापूर जिल्ह्यातील माजी मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते गोविंद कारजोळ यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. तर काँग्रेसने पुन्हा बी. एन. चंद्रप्पा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे परजिल्ह्यातील नेते गोविंद कारजोळ चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघात यशस्वी ठरणार का ते पहावे लागणार आहे.
चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण 8 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मागील विधानसभा निवडणुकीत यापैकी 7 मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. तर केवळ 1 मतदारसंघात भाजप आमदार आहे. त्यामुळे याठिकाणी भाजप नेत्यांना सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात काँग्रेसने तीनवेळा मतदारसंघ गमावला आहे. 17 निवडणुकांपैकी 11 वेळा काँग्रेसचे उमेदवार येथून खासदार झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार दोनवेळा विजयी झाले आहेत. याचबरोबर प्रजा सोशलिस्ट पार्टी, जनता दल, अपक्ष आणि जेडीयुने प्रत्येकी एकदा बाजी मारली आहे. त्यामुळे 18 व्या लोकसभा निवडणुकीत मतदार कोणत्या पक्षाला पसंती देणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
मध्य कर्नाटकचा मैदानी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रदुर्ग जिल्ह्याचा लोकसभा मतदारसंघ 2009 पासून अनुसूचित जातींसाठी राखीव जागा आहे. याचबरोबर जिल्ह्याला राजकारणात स्वत:चे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वेदावधी नदीच्या काठी पसरलेल्या चित्रदुर्ग जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. रामायण, महाभारताची पौराणिक पार्श्वभूमीही जिल्ह्यात आहे. चित्रदुर्गमधीतील चालुक्मय, होयसळ, राष्ट्रकूट यांनी 10 व्या शतकापासून 18 व्या शतकापर्यंत राज्य केले. चित्रदुर्ग सात गोलाकार किल्ल्यांनी वेढलेला आहे. एकेकाळी दावणगेरे हा देखील चित्रदुर्ग जिल्ह्याचा एक भाग होता. शेजारच्या तुमकूर जिल्ह्याचा काही भाग चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. शिरा व पावगड तालुक्मयातील मतदार चित्रदुर्ग लोकसभा उमेदवारांना मतदान करतात. जिल्ह्यात 1952 ते 2019 या लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर निवडणुकीपासून निवडणुकीपर्यंत चुरशीची स्पर्धा झाली हे विशेष. आता पुन्हा लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. पुन्हा एकदा मोदी म्हणून भगवी सेना गर्जना करत असताना भाजपचा पराभव करून सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसचीही जोरदार तयारी सुरू आहे.
मतदारसंघात 1841937 मतदार
मतदारसंघात 919064 पुऊष आणि 922769 महिला असे एकूण 1841937 मतदार आपला हक्क बजावण्यासाठी सज्ज आहेत. 2019 मधील निवडणुकीत 889236 पुऊष, 870772 महिला आणि 103 इतर असे एकूण 1760111 मतदार होते. गेल्या लोकसभेच्या तुलनेत यंदा सुमारे 82 हजार मतदारांची भर पडली आहे.
एस. निजलिंगप्पा चित्रदुर्गच पहिले खासदार
स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस नेते एस. निजलिंगप्पा यांनी 1.26 लाख मते मिळवून विजय मिळवला होता. 1957 मध्ये निजलिंगप्पा राज्याच्या राजकारणाकडे वळल्याने मतदारांनी भारतीय प्रजा सोशलिस्ट पार्टीचे (पीएसपी) जे. एम. महंमद इमाम यांना संसदेत पाठवले. निजलिंगप्पा यांच्याऐवजी रिंगणात उतरलेले रंगनाथराव 11 हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले होते?
जातनिहाय गणना...
- अनुसूचित जाती : 4 लाख
- अनुसूचित जमाती : 3.80 लाख
- लिंगायत : 2.50 लाख
- कुंचिटीग वक्कलिगा : 2.50 लाख
- धनगर : 2 लाख
- गोल्लरू : 2 लाख
- इतर: 2.08 लाख
2019 च्या लोकसभा निवडणूक निकालावर दृष्टीक्षेप
- उमेदवाराचे नाव पक्ष पडलेली मते मतांची टक्केवारी
- ए. नारायणस्वामी भाजप 626195 50.20 टक्के
- बी. एन. चंद्रप्पा काँग्रेस 546017 43.82 टक्के
- महांतेश सी. यु. बसप 8907 0.71 टक्के