राज्यपालांनी ‘वाचली’ मुलांची मने
पुस्तक वाचून जीवन समृद्ध करा : पुसापती अशोक गजपती राजू, गोवा पुस्तक महोत्सवाला दिली भेट
पणजी : नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया (एनबीटी) आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन यांच्यावतीने राज्यात भरविण्यात आलेल्या गोवा पुस्तक महोत्सवात काल, गुऊवारी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी उपस्थित राहून चिमुकल्या शाळकरी ‘मुलांची’ मने वाचली. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी महोत्सवाला भेट दिल्यानंतर त्यांनी या पुस्तक महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट दिल्यानंतर शाळकरी मुलांची भेट घेतली. त्यामध्ये राज्यपालांनी आपला अधिक वेळ मुलांच्या सहवासात घालवला. पुस्तक वाचून जीवन समृद्ध कऊन घ्यावे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध कथांचे, चित्रांची पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला.
एनबीटीचे चेअरमन मिलिंद मराठे, लोकमान्य कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल गजपती राजू यांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपालांनी पुस्तक महोत्सवाची पाहणी केली. पुस्तक वाचन हा संस्कृतीचा पाया आहे. त्यामुळे आपणही अनेक पुस्तकांचे वाचन केले आहे. लेखक, साहित्यिक, कवी हे वाचनसंस्कृतीचे खरे नायक आहेत. त्यांच्यामुळेच आज भारताची ही वाचनसंस्कृती देशाबाहेरही पसरलेली आहे. गोव्यात होणारा हा पुस्तक महोत्सवही वाचनसंस्कृतीचे खरे साहित्यबिंब ठरले आहे. लेखक, वत्ते, अभ्यासक आणि वाचक एकत्र आले. या चर्चांमुळे प्रेक्षकांना ऐकण्याची, विचार करण्याची आणि पुस्तकांच्या पलिकडील कल्पनांशी जोडले जाण्याची संधी प्रत्येकाला मिळाली असल्याचेही राज्यपाल म्हणाले.
‘लोकमान्य’, ‘दै. तरुण भारत’ दालनास राज्यपालांची भेट
गोवा पुस्तक महोत्सवाला उपस्थित राहिल्यानंतर राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी, दै. ‘तरुण भारत’च्या दालनास भेट दिली. यावेळी डॉ. किरण ठाकुर, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे उपस्थित होते. राज्यपाल गजपती राजू यांनी ‘तरुण भारत’ आणि लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीतर्फे सुरु असलेल्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. दालनामध्ये ठेवण्यात आलेल्या ‘दै. तरुण भारत’च्या विशेष अंकाचेही राज्यपालांनी कौतुक केले.