राज्यपाल येती घरा...झटपट आवरा ! महापालिकेच्यावतीने सांगली, मिरज रोडवर अतिक्रमण हटावाची जोरदार मोहिम
पावसात रस्त्याची युध्दपातळीवर कामे : मराठा आरक्षण रास्ता रोको पुढे ढकलला
सांगली प्रतिनिधी
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे बुधवारी 25 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून दौऱ्यामुळे महापालिका, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस यंत्रणा खडबडून कामाला लागली आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने सांगली, मिरज रोडवर अतिक्रमण हटावाची जोरदार मोहिम राबवित दुकाने आणि शोरूमसमोरील शेकडो अतिक्रमणे दूर केली. तर शहरातील रस्त्यांचे चक्क पावसाळयात पॅचवर्क करण्याची युध्दपातळीवर मोहिम सुरू आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील काहींना नोटीस बजाविल्या आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने 2008 साली तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या दौऱ्यावेळी सांगली, मिरजेत खोकी आणि अतिक्रमण हटावाची मोठी मोहिम राबविली होती. त्यानंतर आता राज्यपालांच्या दौऱ्याच्या निमित्ताने महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. सकाळी 11 ते दुपारी एक या वेळेत मिरज येथील शासकीय विश्रामधाम येथे शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते जिल्हयातील विविध क्षेत्रातील निवडक मान्यवरांशी संवाद साधणार आहेत.
राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभुमिवर महापालिका अतिक्रमण निमुर्लन पथकांने सांगली मिरज रोडवरील अनेक अतिक्रमणे हटविण्याची मोहिम राबविली. मार्केट यार्ड, विश्रामधाम चौक, विलिंग्डन, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, विजयनगर, वॉन्लसेवाडी, भारती हॉस्पिटल, कृपामायी, हनुमान मंदिर रेल्वे पुल या मार्गावरील फळ विक्रेते, फेरीवाले, हातगाडीवाले यासह शोरूमसमोरील पायऱ्या, छत आदी अतिक्रमणे जेसीबी लावून हटविली. पालिकेचे कर्मचारी मोठया यंत्रणेसह रस्त्यावर उतरले होते.
त्याबरोबर मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने पावसातच सांगली मिरज रोडवरील खड्डे मुजविण्याची मोहिम राबविली. रस्त्यातील खड्डे आणि पॅचवर्कमुळे सांगली मिरज मार्गावरील वाहतूक विजयनगर येथे एका बाजूने वळविली. मागील तीन महिन्यामध्ये झालेल्या जोरदार पावसाने मनपा क्षेत्रातील रस्त्यांची चाळण झाली आहे. सांगलीतील जवळपास सर्वच रस्त्यावर खोल खड्डे पडले आहेत. मनपाकडून खड्डे मुजविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभुमिवर मराठा आरक्षणासाठी पुकारलेला बुधवारचा रास्ता रोको पुढे ढकलला आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील काहींना पोलीस खात्याच्यावतीने नोटीस बजाविल्या आहेत.