चिकन शोरमावर बंदी घालण्याचा सरकारचा विचार
बॅक्टेरिया, यीस्ट आढळल्याने कारवाई होण्याची शक्यता
प्रतिनिधी/ बेंगळूर
गोबी मंच्युरी आणि कबाबनंतर आता सरकार राज्यात शोरमावर बंदी घालण्याचा विचार करत आहे. चिकन शोरमामध्ये बॅक्टेरिया आणि यीस्ट आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. केरळमध्ये शोरमा खाल्ल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने राज्यात कडक कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
बेंगळूरमध्ये शोरमा गुणवत्ता तपासणी करणाऱ्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाला धक्कादायक बाब समोर आली आहे. आजार निर्माण करणारे बॅक्टेरिया, यीस्ट शोरमामध्ये आढळून आले आहेत. केवळ बेंगळूरच नव्हे तर हुबळी, म्हैसूर, तुमकूर, मंगळूर, बळ्ळारीसह अनेक ठिकाणी ही चाचणी घेण्यात आली. शोरमा तयार करताना स्वच्छतेचा अभाव आहे. तसेच दीर्घकाळ साठवणुकीमुळे त्यात धोकादायक जीवाणू आणि यीस्ट तयार होतात आणि धोकादायक बनतात.
शोरमा खाल्ल्याने आरोग्यावर मोठा परिणाम होतो, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. शोरमा खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर बेंगळूर महानगरपालिका क्षेत्र, बेंगळूर शहर जिल्हा, बेंगळूर ग्रामीण जिल्हा, म्हैसूर, तुमकूर, धारवाड, मंगळूर, बळ्ळारी आणि बेळगाव जिल्ह्यातील कॉर्पोरेशन भागात विकल्या जाणाऱ्या शोरमाच्या अन्न नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. एकूण 17 नमुन्यांपैकी 9 नमुने सुरक्षित असून 8 नमुन्यांमध्ये बॅक्टेरिया आणि यीस्ट आढळून आल्याने ते असुरक्षित असल्याचे ठरवण्यात आले आहे, असे अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने सांगितले.