लष्कराच्या ताब्यातील जमीन घेण्यासाठी सरकारचे प्रयत्न
मुख्यमंत्री सावंत यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा : सैनिक शाळेला मंजुरी देण्याच्या प्रस्तावावरही विचार
पणजी : पणजी शहरात संरक्षण दलाच्या अखत्यारीत येणारी लष्कराची कार्यालये आहेत. ती कार्यालये बांबोळी येथील लष्कराच्या हजारो हेक्टर जमिनीत न्यावी, तसेच सद्य:स्थितीत लष्कराच्या ताब्यात असलेली जमीन गोवा सरकारला मिळावी, यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन या विषयावर दीर्घ चर्चा केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची काल सोमवारी दिल्लीत भेट घेतली. बांबोळी येथे लष्कराला हजारो हेक्टर जमीन देण्यात आलेली आहे. या ठिकाणी लष्कराची सर्व कार्यालये एकत्रित आणणे शक्य आहे.
त्यामुळे पणजीतील ज्या ठिकाणी लष्कराचे कार्यालय आणि इतर काही कामे चालतात ती जागा गोवा सरकारला मिळावी, यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी केलेली आहे. गोव्यातील हेमरो युनिट त्वरित कार्यान्वित करणे, विद्यमान जागेचा सार्वजनिक वापर सुलभ करण्यासाठी पणजी लष्करी आणि दंत ऊग्णालयांचे स्थलांतर आणि राज्यात एका सैनिक शाळेला मंजुरी देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री सावंत यांनी संरक्षण मंत्र्यांसमोर मांडला. या सर्व मुद्यांवर दीर्घ चर्चेअंती गोवा सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी दिल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी रात्री उशिरा सांगितले.