सुटी जाहीर न करण्याचा सरकारचा निर्णय
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
अयोध्येतील राममंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिवशी राज्यात सुटी जाहीर न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे कर्नाटकात सोमवारी सरकारी सुटी जाहीर करण्याची मागणी भाजपने केली आहे. मात्र, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुटी जाहीर करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी सरकारी सुटीवर रविवारी आपली भूमिका जाहीर केली. तुमकूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले, सोमवारी धर्मादाय खात्यांतर्गत येणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये विशेष पूजा होणार आहे. पण, सरकारी सुटी नाही. तसेच धर्मादाय मंदिरांमध्ये आयोजित प्रसाद व्यवस्थेची आपल्या माहिती नाही. आपण आज बेंगळूरच्या महादेवपूर येथे राम मंदिराचे उद्घाटन करणार आहे. मला कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिराचे उद्घाटन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप आणि निजदच्या नेत्यांनी रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा दिवशी राज्यात सरकारी सुटी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते कोटा श्रीनिवास यांनी पुजारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून विनंती केली होती. तसेच हिंदुत्ववादी संघटना, बेंगळूर वकील संघानेही रजेची विनंती केली होती. मात्र, अखेर सिद्धरामय्या यांनी सुटीची घोषणा करणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे.
तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अप्रत्यक्षपणे सुटीची घोषणा करणार नाही, असे सांगितले होते. याबाबत सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यासह काही मंत्र्यांनी बेंगळुरातील एका खासगी हॉटेलमध्ये काहीवेळ चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. आता अखेर मुख्यमंत्र्यांनी सुटी जाहीर करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हिंदू आणि भाजप नेत्यांकडून आक्रोश व्यक्त होत आहे.