उपजिल्हा रुग्णालयात 9 नोव्हेंबरपर्यंत सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
शासनाचे कोल्हापूर सर्किट बेंचसमोर प्रतिज्ञापत्र
सावंतवाडी । प्रतिनिधी
सात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची तातडीने 9 नोव्हेंबर पर्यंत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नियुक्ती केली जाईल असे प्रतिज्ञापत्र शासनाच्या वतीने आज कोल्हापूर सर्किट बेंचसमोर सादर करण्यात आले. एमपीएससी मार्फत नियमित वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरली जातील असे शासनाच्या वतीने सरकारी वकीलांनी न्यायालयात सांगितले. यासंदर्भात शासनाने भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली असल्याचे सरकारी वकिल सिध्देश्वर कायल यांनी सांगितले.
अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग तर्फे वकील महेश राऊळ यांनी सात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांनी राजिनामा नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत कोणती पर्यायी व्यवस्था केली याची विचारणा केली.होती. याबाबत शासनाच्या वतीने सादर प्रतिज्ञापत्र नियुक्ती प्रक्रियेची माहिती देण्यात आली. 3 डिसेंबर 2018 च्या शासन आदेशा प्रमाणे कंत्राटी तत्वावर भरतीचे अधिकार जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात आले आहेत. जिल्हा स्तरावर भरती प्रक्रिया राबविले जाते. या प्रक्रियेत वॉक इन इंटरव्यू पध्दतीने मुलाखती घेऊन कंत्राटी अकरा महिने तत्वावर नियुक्ती दिली जाते. त्यानुसार मुलाखत प्रक्रिया झाली आहे. नोटीस परियेड संपल्यावर सर्व संबधीत सात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांच्या जागी नव्या नियुक्त्या केल्या जातील. सत्य शोधन समितीने दिलेल्या अहवाला नुसार शासन स्तरावर पुढील कार्यवाही सुरु आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले. नियमित वैद्यकीय अधिकारी यांची पद भरती एमपीएससी मार्फत नियमित करण्यासाठी 1हजार चारशेहून अधिक पदांकरीता राज्यस्तरीय जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्या व्दारे भरती प्रक्रिया होऊन सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयास वैद्यकीय अधिकारी मिळतील, असे सरकारी वकिलांनी सांगितले.