सरकारी पदवीपूर्व अतिथी प्राध्यापकांचे आंदोलन
बेळगाव : राज्यातील पदवीपूर्व कॉलेजमध्ये सध्या तुटपुंज्या वेतनावर अतिथी प्राध्यापक कार्यरत आहेत. या अतिथी प्राध्यापकांना कोणत्याही सेवासुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांचे मासिक वेतन 12 हजारावरून 30 हजार करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी सुवर्ण विधानसौधसमोर सरकारी पदवीपूर्व अतिथी प्राध्यापक संघटनेने आंदोलन केले. सेवाज्येष्ठता व दर्जेदार शिक्षण याचा विचार करून अतिथी व्याख्यात्यांची नेमणूक करावी. दर आठवड्याला केवळ दहा ते बारा तास काम देण्यात यावे. 2023-24 या शैक्षणिक वर्षातील फेब्रुवारी महिन्याचे अतिथी प्राध्यापकांचे वेतन वेळेत द्यावे. त्यांना बारा महिने अतिथी प्राध्यापक म्हणून नेमणूक द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. अल्लमप्रभू बेरदूर, व्ही. एन. राजशेखर, राजरत्न यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यभरातील अतिथी प्राध्यापक उपस्थित होते.