कुंभमेळ्याला जाण्यासाठी सरकारतर्फे मोफत रेल्वे
6, 13 व 21 फेब्रुवारीला सकाळी मडगावहून सुटणार : नावनोंदणीसाठी 0832223257 वर संपर्काचे आवाहन
पणजी : प्रयागराज-उत्तर प्रदेश येथील कुंभमेळ्याला जाण्यासाठी गोवा सरकारतर्फे गोमंतकीयांसाठी 3 विशेष रेल्वेगाड्यांची सोय करण्यात आली असून त्या मडगाव स्थानकातून सुटणार आहेत. पहिली रेल्वे उद्या गुरुवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सुटणार असून तिला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मंत्री, आमदार हिरवा बावटा दाखवणार आहेत. या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी (0832-223257) या फोनवर नोंदणी करावी, असे कळवण्यात आले आहे. समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. ते म्हणाले की, प्रत्येकी रेल्वेत एक हजारच्या आसपास असे मिळून तीन रेल्वेगाडीतून सुमारे 3 हजार जणांना कुंभमेळ्याला जाण्याची संधी लाभणार आहे. रेल्वेतून जाण्याचा आणि परत येण्याचा खर्च सरकार करणार असून रेल्वेतून उतरल्यानंतर तेथील पुढील खर्च (रहाणे - जेवण - नाश्ता इत्यादी) प्रवाशाला करावा लागणार आहे, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.
वय वर्ष 18 ते 60 या वयोगटातील चांगले आरोग्य असलेल्या लोकांनीच नोंदणी करावी. रेल्वे प्रयागराज या स्थानकापर्यंत न जाता त्याच्या अलिकडे 5 कि.मी. अंतरावरील स्टेशनपर्यंतच जाणार आहे. तेथूनच ती परतीच्या प्रवासाला निघणार आहे. त्या ठिकाणाहून पुढील प्रयागराजपर्यंतचा प्रवास खर्च प्रवाशांनी करायचा आहे तसेच परत त्या स्थानकावर येण्याचा खर्चही त्यांनीच केला पाहिजे. मुख्यमंत्री देवदर्शन योजनेतून सदर रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. गोव्यातून तेथे जाण्यासाठी एकूण 34 तासांचा प्रवास असून 6 फेब्रुवारीला पहिली, 13 फेब्रुवारीला दुसरी तर 21 फेब्रुवारीला तिसरी रेल्वे मडगांव स्थानकातून सकाळी 8 वा. सुटणार असल्याचे ते म्हणाले. ‘प्रथम आरक्षण करणाऱ्यास प्रथम’ या तत्त्वावर सदर रेल्वेगाडीत प्रवेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.