देशातील आणखी दोन बँकांच्या खासगीकरणाची शक्यता; चार सरकारी बँकांतील हिस्सा कमी करण्याच्या हालचाली....कोणत्या बँकांचा समावेश?
सरकार या चार बँकांमधील आपली समभागविक्री पुढील वर्षभरात करण्याच्या शक्यतेचा विचार करत आहे. संबंधित बँका बाजारातून भांडवल उभारू शकतात किंवा सरकार बाजारातील परिस्थितीनुसार ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) पद्धतीने आपले समभाग विकू शकते. यामुळे या बँकांमधील सार्वजनिक गुंतवणूकदारांचा सहभाग वाढण्याची शक्यता आहे.
आणखी दोन बँकांच्या खासगीकरणाचा विचार
सरकारी बँकांचे एकत्रीकरण करण्याच्या प्रस्तावाचाही केंद्र सरकार विचार करत असल्याचे वृत्तात म्हटले आहे. या प्रक्रियेत आणखी दोन बँकांची खासगीकरणासाठी निवड होण्याची शक्यता आहे. यापूर्वी नीती आयोगाने सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांची संभाव्य खासगीकरणासाठी निवड केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, नव्या खासगीकरण प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय झाल्याची माहिती उपलब्ध नाही.
देशात दीर्घकालीन दृष्टीने तीन ते चार मोठ्या सरकारी बँका असाव्यात, असे केंद्राचे उद्दिष्ट असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. बँकांचे विलीनीकरण करताना त्यांची तंत्रज्ञान व्यवस्था, भौगोलिक विस्तार आणि व्यवसायाचे स्वरूप यांचा विचार केला जाणार आहे. या प्रक्रियेत संबंधित बँकांकडूनही सूचना घेतल्या जाण्याची शक्यता आहे.
खासगीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक
सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यासाठी बँकिंग कंपन्या (उपक्रमांचे अधिग्रहण आणि हस्तांतरण) कायद्यासह संबंधित कायद्यांमध्ये दुरुस्ती करावी लागू शकते. विलीनीकरण आणि खासगीकरणाची प्रक्रिया समांतरपणे पुढे नेण्याचा पर्यायही विचाराधीन असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
केंद्र सरकारने २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात आयडीबीआय बँकेव्यतिरिक्त दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एका सर्वसाधारण विमा कंपनीचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती.
सार्वजनिक समभागधारणेच्या नियमांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता
सरकारी कंपन्या आणि वित्तीय संस्थांना किमान २५ टक्के सार्वजनिक समभागधारणेच्या नियमातून ऑगस्ट २०२६ पर्यंत सूट देण्यात आली होती. या सवलतीला आणखी मुदतवाढ देण्याची अधिसूचना जारी होण्याची शक्यता असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, आयडीबीआय बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेत समभागांच्या किमतीतील चढ-उतार आणि मर्यादित व्यवहार लक्षात घेऊन बाजारभाव हा बँकेच्या वास्तविक व्यावसायिक मूल्याचे प्रतिनिधित्व करतोच असे नाही, अशी भूमिका सरकारने मांडल्याचे वृत्त आहे.
चार बँकांमधील हिस्सा विक्री, संभाव्य विलीनीकरण आणि खासगीकरणाबाबतचे प्रस्ताव अद्याप विचाराधीन असल्याचे वृत्तातून स्पष्ट होते. या संदर्भातील अंतिम निर्णय आणि पुढील कार्यवाहीकडे बँकिंग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
