सरकारने लोकांच्या मनाविरुद्ध जाऊन विकास प्रकल्प लादू नयेत
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केलेले मत
मडगाव : लोकांचा विरोध असेल, तर सरकारने त्यांच्या मनाविऊद्ध जाऊन विकास प्रकल्प लादू नयेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी म्हटले आहे. फातोर्डा येथील सागच्या मैदानावर शनिवारी झालेल्या क्रिकेट स्पर्धेच्या वेळी पत्रकारांशी बोलताना नाईक म्हणाले की, विकास हा लोकांसाठी असतो आणि त्यांच्या इच्छेविऊद्ध तो लादता येत नाही. जर लोकांना कोणताही प्रकल्प नको असेल, तर सरकारने ते प्रकल्प त्यांच्यावर लादू नयेत. शेवटी विकास हा लोकांसाठी आहे. सरकार लोकांच्या फायद्यासाठी विकास करते. परंतु जर लोकांना ते नको असेल, तर प्रकल्प पुढे रेटून नेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले. गोव्यात सुरु असलेल्या आंदोलनांमुळे 2027 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या संधीवर त्यांचा परिणाम होऊ शकतो का याबद्दलच्या प्रश्नांना नाईक उत्तर देत होते.
मीराबागप्रश्नी योग्य निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती
मीराबाग येथील रहिवासी मागील काही दिवसांपासून बंधारा बांधण्याविऊद्ध निदर्शने करत असून त्याबद्दल आणि जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल विचारले असता, नाईक म्हणाले की मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना परिस्थितीची जाणीव आहे. त्यांनी पुढे म्हटले की, पक्षाने मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी पडताळणी करण्याची आणि उपस्थित करण्यात आलेल्या चिंतांकडे योग्य लक्ष देऊन योग्य निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
2027 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आरजी आणि आम आदमी पक्ष युती करु शकतात अशा आशयाच्या वृत्तांबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना नाईक म्हणाले की, भाजपविरोधी गटांतील घडामोडाची आपणास चिंता नाही. विरोधकांना त्यांच्या बाजूने काय चालले आहे हे माहित आहे. आम्हाला तिथे काय चालले आहे यात रस नाही. भाजप आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे आणि पुढे जाण्यासाठी पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर अवलंबून आहे, असे उद्गार त्यांनी काढले.