सरकारी शाळांनी समाजाभिमुख बनावे
शिक्षण विभागाची सूचना : समाजमाध्यमांवर उपक्रमांची माहिती द्यावी
बेळगाव : खासगी शाळांना टक्कर देण्यासाठी सरकारी शाळांनीही आपले सोशल मीडिया अकाऊंट काढून शाळेमध्ये होणारे कार्यक्रम, उपक्रम यांची माहिती द्यावी, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. 2026-27 या आगामी शैक्षणिक वर्षात प्रवेश वाढविण्यासाठी आतापासूनच शिक्षण विभागाने कंबर कसली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून खासगी शाळा अधिकाधिक जाहिरातबाजी करीत असतात. शाळेमध्ये होणारे उपक्रम, गुणवत्ता, विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे समाजमाध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले जाते. तसेच शाळेमध्ये असलेल्या सोयी-सुविधा, शिक्षणाचा दर्जा, अत्याधुनिक शैक्षणिक साहित्याचा वापर या सर्वांची माहिती देण्याचा प्रयत्न असतो.
खासगी शाळांच्या तुलनेत समाजमाध्यमांवर माहिती देण्यात सरकारी शाळा मागे पडत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले. यासाठीच आता काही मोठ्या सरकारी शाळांनी आपले सोशल मीडिया अकाऊंट सुरू केले आहे. यामुळे पालकांनाही पाल्याच्या शाळेमध्ये कोणते उपक्रम सुरू आहेत, याची माहिती मिळू लागली आहे.
माजी विद्यार्थी संघटनेचीही मदत घ्यावी
शालेय शिक्षण विभागाकडून फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यासारख्या समाजमाध्यमांवर खाते उघडून शाळेची सर्व माहिती यामध्ये देण्याची सूचना करण्यात आली आहे. शाळेची प्रवेश प्रक्रिया, प्रत्येक दिवसाची माहिती या माध्यमातून द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. यासाठी माजी विद्यार्थी संघटनेचीही मदत घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शाळेचा एखादा माजी विद्यार्थी मोठ्या पदावर असेल तर त्याची माहितीही देण्यात यावी, असे सांगण्यात आले.