For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरकारचे विरोधकांना कृतीतून उत्तर!

12:30 PM Feb 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
सरकारचे विरोधकांना कृतीतून उत्तर
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उद्गार: फोंड्यात ‘सरकार तुमच्या दारी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद 

Advertisement

फोंडा : फोंड्यातील नागरिकांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही एकाच छताखाली 50 सरकारी कार्यालये घेऊन 24 तासांत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘सरकार तुमच्या दारी’ दुसऱ्या आवृत्तीचा जनता दरबार भरविण्यात यशस्वी झालो. सरकार गोव्यातील जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करेल. विकसित गोवा विकसित भारत बनविण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. विरोधकांना नेहमी कृतीतून उत्तर देणारे आमचे डबल इंजिन ‘सरकार तुमच्या दारी’ तून सर्व नागरिकांचे प्रश्न सोडविणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात काल शुक्रवारी आयोजित ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे, फोंड्याचे नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, राजीव गांधी कला मंदिरचे अध्यक्ष रितेश नाईक, मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलु, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अॅग्ना क्लिटस, नगरसेवक, पंचसदस्य व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

आयडी इस्पिळाला मिळेना न्यूरो सर्जन

यावेळी पुढे बोलताना डॉ. सावंत यांनी फोंड्यातील आयडी इस्पितळात सीटी स्कॅन अनुपलब्धतेबाबत अडचण स्पष्ट केली. आयडी इस्पितळात न्यूरो सर्जनच्या पदाची अनेकवेळा जाहिरात दिल्यानंतरही ऊजू होण्यास कोणताही न्यूरो सर्जन डॉक्टर तयार होत नाही. जर कोणत्याही इच्छुक खाजगी न्यूरो सर्जनला फोंडा उपजिल्हा ऊग्णालयात सेवा देणे शक्य असल्यास तर सरकार सीटी स्कॅन मशीन कार्यान्वित करेल, असे ठाम आश्वासन दिले.

मासळी मार्केटचा प्रश्न सोडविणार 

जनता दरबार आयोजित करताना मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या विविध समस्यांवर लक्ष केंद्रित केले. ज्यामध्ये बेतोडा निरंकाल येथे अनियमित कदंब बससेवा, निरंकाल येथील जीर्ण अवस्थेत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, खांडेपार येथील नाला ओलांडण्यासाठी विद्यार्थ्यांना होणारा त्रास यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ संबंधित विभाग प्रमुखांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.

दिवंगत रवी नाईक यांच्या अनुपस्थितीत फेंडा मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारलेली असून कोणत्याही परिस्थितीत फोंडा विकासाच्या बाबतीत मागे राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. फेंड्यातील मासळी बाजारातील विव्रेत्यांचा प्रश्न सोडविणार असून कोविड काळात त्यांना द्यावा लागलेला भुर्दंडही कसा माफ करता येईल, यावर विचारविनियम करणार असे सांगितले.

डॉ. भाटीकर पोचले सरकारच्या दारी

रायझिंग फोंडाचे नेते डॉ. केतन भाटीकर ‘सरकार तुमच्या दारी’ घटनास्थळावर पोचल्यानंतर कला मंदिरच्या मुख्यमंत्री जनता दरबारात जाऊन आपली गाऱ्हाणी मांडली. आयडी हॉस्पिटलात वैद्यकीय सुविधा तातडीने पुरविण्याची मागणी केली.  खांडेपार नदीच्या पात्रात रेती माफियाचा वावर वाढल्याचा प्रश्न उपस्थित केला. गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत सरकारी नोकरीत भरती केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. तसेच राजीव गांधी कला मंदिरच्या संचालक मंडळावर एका कलाकार  महिलेची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी केली.

 विरोधकांना कृतीतून उत्तर देतो ‘सरकार तुमच्या दारी’  

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले विरोधी पक्ष सरकारवर टीका करण्यात आनंद घेतात पण आमचे सरकार टीकेला कृतीने उत्तर देत आहे. आमच्या ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमातून एकही नागरिक रिकाम्या हाताने परतणार नाही, असे सांगून  मुख्यमंत्र्यांनी माझे घर योजना आणि अटल आसरा योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण केले. तत्पुर्वी कुर्टी येथील कृषी बाजाराच्या छतावर कार्यान्वित करण्यात आलेल्या 165 ग्रीड सौर उर्जा युनिटचे आभासी माध्यमातून संगणकावर कळ दाबून उद्घाटन केले. मुख्यमंत्र्यांनी उशिरा दुपारपर्यंत नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली. त्यानंतर स्वयंपूर्ण मित्र आणि सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, ‘सरकार लोकांच्या हितासाठी काम करीत आहे. बारा महालापैकी एक असलेल्या अंत्रुज महालातील नागरिकांच्या सर्व समस्याचे निवारण करू, असे आश्वासन दिले. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्वागत केले. उत्तर गोवा जिल्हाधिकारी अॅग्ना क्लिटस यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.