विनाअनुदानित शाळांबद्दल सरकार सकारात्मक
हुबळी येथील मेळाव्यात सभापती होरट्टी यांचे उद्गार
बेळगाव : 1995 नंतरच्या विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याबाबत सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन असल्याचे दिसून आले आहे. हुबळी येथे नुकत्याच झालेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या महामेळाव्यात अनुदान देण्याबाबत चर्चा झाली. कन्नड, मराठी तसेच ऊर्दू माध्यमातील शाळांना अनुदान देण्यासाठी सरकारकडून काय प्रयत्न सुरू आहेत, याची माहिती विधान परिषदे सभापती बसवराज होरट्टी यांनी दिली. बसवराज होरट्टी, विधान परिषद सदस्य संकनूर, लक्ष्मण चिंगळे यांच्यासह उत्तर कर्नाटकातील विनाअनुदानित शाळा संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. विधान परिषद सदस्य संकनूर यांनी अधिवेशनात आवाज उठवण्याचे आश्वासन दिले. लक्ष्मण चिंगळे यांनी पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांसोबत शाळांना अनुदान मिळवून देण्यासाठी चर्चा करू, असे सांगितले. यावेळी बेळगाव जिल्हा अनुदानित संघटनेचे अध्यक्ष एस. एस. मठद, संघटनेचे अध्यक्ष जी. सी. शिवाप्पा, जी. आर. भट, एम. ए. कोरीशेट्टी, सलीम कित्तूर यांनी विचार मांडले. यावेळी पी. पी. बेळगावकर, मारुती अजानी, के. पी. शिनोळकर, पी. जी. गावडे, मारुती कंग्राळकर, यल्लाप्पा गावडा, एन. व्ही. आपटेकरसह बेळगावमधील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.