For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी सैनिकाच्या खून प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग

01:23 PM Jun 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
माजी सैनिकाच्या खून प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग
Advertisement

पोलीस अधिकारी, प्रयोगशाळेतील त्रिकुटासह डॉक्टरलाही अटक

Advertisement

बेळगाव : घोडगेरी, ता. हुक्केरी येथील माजी सैनिकाचे खून प्रकरण सरकारी अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे त्यांच्याही अंगलट आले आहे. पोलीस आयुक्त कार्यालयातील एक अधिकारी, हिडकल डॅम परिसरातील एक डॉक्टर व प्रयोगशाळेतील तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या सातवर पोहोचली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयात काम करणारा अशोक गुजनाळ, त्याचा नातेवाईक असणारा हिडकल डॅम येथील डॉ. राजू भस्मे यांनी विधिविज्ञान प्रयोगशाळेतील तिघा जणांना हाताशी धरून शवचिकित्सा अहवालच बदलल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळेच त्यांचीही धरपकड करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी माजी सैनिक संदीप मंजरगी (वय 46) राहणार घोडगेरी याचा सलाईनमध्ये विष घालून खून करण्यात आला होता. अपघाती मृत्यू भासवून त्याच्यावर अंत्यक्रियाही करण्यात आली होती. ज्यावेळी शवचिकित्सेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, त्याचा अहवाल आहे तसा आला असता तर कदाचित यापूर्वीच पत्नी व प्रियकराला अटक झाली असती.

हिडकल डॅम येथील डॉ. राजू याने पोलीस आयुक्त कार्यालयातील आपलाच नातेवाईक अशोक गुजनाळ याला भेटून विधिविज्ञान प्रयोगशाळेतील तिघा जणांची मदत घेऊन शवचिकित्सा अहवालच बदलला आहे. दोन दिवसांपूर्वी पुरलेला मृतदेह पुन्हा उकरून काढून तो विधिविज्ञान प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणाचे गांभीर्य कळणार आहे.माजी सैनिकाच्या खून प्रकरणी त्याची पत्नी सुमा, तिचा प्रियकर पुंडलिक डोंबर यांना आधीच अटक झाली आहे. आता विधिविज्ञान प्रयोगशाळेतील तिघा जणांसह पाच जणांना अटक झाली असून माजी सैनिकाचा खून पचवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी पत्नी व प्रियकराला मदत केल्याचे उघडकीस आले असून यासंबंधीची आणखी माहिती बाहेर पडायची आहे. लवकरच जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन हे चौकशीचा तपशील जाहीर करणार आहेत.

Advertisement

व्हिडिओतून अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा

माजी सैनिकाची पत्नी सुमाचा प्रियकर पुंडलिक डोंबरने जारी केलेल्या 3 मिनिटे 22 सेकंदाच्या व्हिडिओत अनेक धक्कादायक गोष्टींचा त्याने उलगडा केला आहे. घोडगेरीत आपण एग राईसचे दुकान चालवत होतो. माजी सैनिक संदीप मंजरगी यांच्या सांगण्यामुळे आपण आपले दुकान बंद करून त्यांच्या दुकानात काम करू लागलो. त्यावेळी त्यांची पत्नी सुमाचा परिचय झाला. दोघांमध्ये चांगले संबंध निर्माण झाले. संदीप यांना पत्नी दारू पाजवायची. झोपेच्या गोळ्याही द्यायची. यासंबंधी आपण ज्यावेळी प्रश्न विचारले, त्यावेळी तो मेला तर मरू दे, असे तिने सांगितले होते. जत्रेहून परतताना झालेल्या किरकोळ अपघातानंतर संदीप यांना घटप्रभा येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सुमाने आपल्याशी संपर्क साधून घरी ढेकूण, किडे खूप झाले आहेत. ते मारण्यासाठी औषध आणून दे, असे सांगितले. पती इस्पितळातून येण्याआधी घरी औषध शिंपडायचे आहे, असेही तिने सांगितले होते. त्यामुळे आपण तिला कीटकनाशक आणून दिले. त्याच्या दुसऱ्या दिवशीच संदीप यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही पुंडलिकने सेल्फी व्हिडिओत केली आहे.

Advertisement
Tags :

.