महाराष्ट्र सरकारची वैद्यकीय मदत योजना सीमावासियांसाठीही लागू
खासदार धैर्यशील माने, मंगेश चिवटे यांची माहिती
बेळगाव : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना आता सीमाभागातील 865 गावांमधील नागरिकांनाही मिळणार आहे. विविध प्रकारच्या दुर्धर गंभीर आजारांच्या उपचारासाठी महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील सीमालगत असणाऱ्या जिल्ह्यांसह बेळगाव जिल्ह्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना या सुविधेचा लाभ करुन दिला जाणार आहे, अशी माहिती सीमाप्रश्न तज्ञ समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने व मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.
मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या योजनाची माहिती देण्यात आली. सीमाभागातील मराठी बांधवांना महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री वैद्यकीय योजनेचा लाभ करुन देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी घालण्यात आलेल्या अटी शिथील करुन सीमाभागातील 865 गावांमधील जनतेला वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत. या योजनेचा सीमाभागातील नागरिकांना लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मध्यवर्तीचे शिफारस पत्र, रुग्णाचे आधारकार्ड, रेशनकार्ड, 1.60 लाख पर्यंत उत्पन्नाचा दाखला, अपघातग्रस्त व्यक्तीचा एमएलसी रिपोर्ट, निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र अशी कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. याबराब्sारच यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी टोलफ्री क्रमांक उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. या योजनेचा लाभ घेताना उपचार घेत असणारे रुग्णालय 30 बेडपेक्षा कमीचे असू नये, असे त्यांनी सांगितले.
विविध प्रकारच्या 20 आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी या योजनेचा लाभ करुन दिला जाणार आहे. हृदयप्रत्यारोपण, किडणी प्रत्यारोपण, गुडघा प्रत्यरोपण, घुबा प्रत्यारोपण, डायलेसीस, अपघातग्रस्त, फुफ्फुस प्रत्यारोपण, कर्करोग, मेंदूचे आजार, लहान बालकांना असणारे गंभीर आजार अशा प्रकारच्या 20 आजारांवर या योजनेतून उपचार दिले जाणार आहेत. यासाठी योजनेची जागृती करण्यात यावी. सीमाभागातील प्रत्येक गावामधील नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यास सोयीचे व्हावे यासाठी पत्रके वाटप करुन जागृती करण्याचे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले. ही योजना सीमाभागातील मराठी भाषिकांनाही लागू करण्यात यावी. योजनेचा लाभ करुन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडूनही पाठपुरावा करुन परिश्रम घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रणजीत चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडुस्कर, मालोजी अष्टेकर आदी उपस्थित होते.
आरोग्य सुविधा...
- गंभीर आजारांच्या उपचारासाठी मदत
- म. ए. समितीचे शिफारस पत्र आवश्यक